लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : टेक प्राॅफीट कंपनीद्वारे एलएक्सएफएक्स लिक्युडीटी ऑफ सोल्यूशन ॲप्लिकेशन सुरु करुन सभासद गुंतवणुकदारांना चांगला परतावा देतो, असे सांगून १ कोटी ७५ लाख १४ हजार ८६६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील पाच जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला. समीर जोशी, सुरेश पवार, जैसन राॅड्रीक, प्रेम चौधरी, अभिजित दुधवडकर (सर्व रा. मुंबई) अशी गुन्हा नोंद झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पांडुरंग बाळासाहेब पाटील (वय ३९, रा. सादळे, ता. करवीर, सध्या रा. साई मंदीरसमाेर, रंकाळा स्टॅंड, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.
सप्टेंबर २०१९ ते २० ऑक्टोबर २०२० या मुदतीत फिर्यादींसह साक्षीदारांनी संशयित पाचजणांकडे टेक प्राॅफीट कंपनीद्वारे एलएक्सएफएक्स लिक्युडीटी ऑफ सोल्यूशन ॲप्लिकेशनमध्ये सभासद होऊन एकूण १८ लाखांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीची मुंदत संपल्यानंतरही संशयितांनी त्याचा फिर्यादींसह साक्षीदारांना मिळणारा १ कोटी ७५ लाख १४ हजार ८६६ रुपयांचा परतावा दिला नाही. फिर्यादीने त्यांच्याशी संर्पक साधून परतावा देण्यासंबंधी अनेकदा पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्यांनी व त्यांच्या कंपनीने दाद दिली नाही. त्यामुळे अखेरीस फिर्यादी पाटील यांनी जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. मात्र, हा गुन्हा घाटकोपर (मुंबई) येथे घडल्याने तो जुना राजवाडा पोलिसांनी मुंबई पोलिसांकडे वर्ग केला.