भागवत काटकर ।शेगाव : महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व आघाडीचे शासन पाच वर्षे टिकावे, यासाठी बनाळी (ता. जत) येथील माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना नेते संजय सावंत व त्यांच्या सौभाग्यवती रूपाली सावंत यांनी ग्रामस्थांसह पंढरपूरला पायी अनवाणी चालत जाऊन विठुरायाच्या चरणी साकडे घातले होते. आता सावंत यांनी घातलेले साकडे पंढरीच्या विठ्ठलाने पूर्ण केले असून, सावंत यांना थेट ‘मातोश्री’वरून खासदार विनायक राऊत यांनी फोन करून, मुख्यमंत्री शपथविधीसाठी सपत्नीक निमंत्रित केले आहे. त्यामुळे सावंत दाम्पत्य मंगळवारीच मुंबईकडे रवाना झाले.
सावंत यांनी पंढरीला पायी चालत जाऊन, मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे उद्धव ठाकरे व विकास महाआघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे, यासाठी पंधरा दिवसांपूर्वी पंढरीच्या विठ्ठलाला साकडे घातले. या दिंडीमध्ये शिवसेना तालुका उपप्रमुख शिवाजी पडळकर, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऊर्फ बंटी दुधाळ, राहुल पाटील, बी. आर. सावंत, उद्धव सावंत, सिद्राम माळी, हनुमंत कोरे, सावळा माळी, अनिल सावंत, तुकाराम जाधव, प्रकाश सावंत, जी. एस. सावंत, गणेश कोडग, गणेश सावंत, गणेश काशीद, राजश्री माळी, लक्ष्मी माळी सहभागी होते. दरम्यान, परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खानापूर तालुक्यात आले होते. त्यावेळी ठाकरे यांची सावंत दाम्पत्यांनी भेट घेत, मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा व आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकावे यासाठी पंढरीला पायी चालत गेल्याचे सांगितल्यावर, पक्षप्रमुख ठाकरे यांनी सावंत दाम्पत्याला शपथविधीस बोलावणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी सावंत यांना राऊत यांनी फोनवरून शपथविधीचे आमंत्रण दिले. वीणा, तुळशी वृंदावनसह सावंत दाम्पत्य मुंबईस रवाना झाले आहे.