कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या गेन बिटकॉइनशी कोल्हापुरातील एएस ट्रेडर्स कंपनीचा संबंध असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एएस ट्रेडर्सने तीन वर्षांपूर्वी दुबईत बिटकॉइनमधील गुंतवणुकीची योजना जाहीर केली होती. त्यानुसार अनेकांनी बिटकॉइनध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती. सीबीआयने केलेल्या छापेमारीतून एएस ट्रेडर्सचा संबंध स्पष्ट होऊ शकतो. दरम्यान, सीबीआयच्या छाप्यांबद्दल काही माहिती उपलब्ध नसल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्पष्ट केले.गेन बिटकॉइन या क्रिप्टो करन्सीद्वारे दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ६ हजार ६०० कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या गुन्ह्याचा तपास करताना सीबीआयच्या पथकांनी देशात ६० ठिकाणी छापे टाकले. यात कोल्हापूरसह पुणे, नांदेड, दिल्ली, बंगळुरू, चंदीगड या शहरांचा समावेश आहे. छापेमारीतून २४ कोटींचा मुद्देमाल आणि काही पुरावे जप्त केल्याचेही सीबीआयने स्पष्ट केले आहे.या कारवाईत कोल्हापूरचाही समावेश असल्याने स्थानिक पोलिस सतर्क झाले आहेत. गेल्या आठ-दहा वर्षांत दाखल झालेल्या आर्थिक फसणुकीच्या गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. कोल्हापूरसह इचलकरंजीत बिटकॉइनद्वारे फसवणूक झाल्याचे गुन्हे दाखल आहेत. एएस ट्रेडर्स कंपनीने जाहीर केलेल्या बिटकॉइन योजनेतही फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.एएस ट्रेडर्सशी संबंध?गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या एएस ट्रेडर्सने बिटकॉइनमध्ये गुंतवणूक केली होती. याचा एक समारंभ दुबईत झाला होता. संशयित आरोपी अमर चौगुले हा वारंवार त्याच्या सेमिनारमधून बिटकॉइनची जाहिरातबाजी करीत होता. त्यामुळे या गुन्ह्यात एएस ट्रेडर्सचा संबंध आहे काय, याचा शोध पोलिसांना घ्यावा लागेल.
जिल्ह्यात दहाहून अधिक गुन्हेगेल्या आठ वर्षांत बिटकॉइनमधून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे दहाहून जास्त गुन्हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमधील काही संशयितांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. काही संशयित अद्याप पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.