कोल्हापूर : गंगावेशीतील सुभाष हरी कुलकर्णी (वय ७७) यांना करणी केल्याची भीती घालून त्यांच्याकडून ८४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल उकळणाऱ्या टोळीत पोलिस महिलेचा समावेश आहे. गुन्हा दाखल होताच सिंधुदुर्गपोलिस मुख्यालयात सेवेत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक ही पसार झाली आहे. तिच्या अटकेसाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधला असून, लवकरच तिच्यासह अन्य संशयितांनाही अटक होईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली.कोकणातील दादा पाटील महाराज (पाटणकर), आण्णा उर्फ नित्यानंद नारायण नायक आणि सोनाली पाटील उर्फ धनश्री गणपत काळभोर या तिघांनी फिर्यादी कुलकर्णी यांना करणी केल्याची भीती घातली. त्यासाठी सिंधुदुर्ग येथे कार्यरत असलेली कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक हिची मदत घेतली. कुलकर्णी यांच्या घराची पाहणी करण्यासाठी मुळीक ही इतर संशयितांसोबत कोल्हापुरात आली होती. अनेक विधींसाठीही ती उपस्थित होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ती तोतया पोलिस असावी, असा जुना राजवाडा पोलिसांना संशय होता.मात्र, अधिक माहिती काढताच वस्तुस्थिती समोर आली. तिच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात गेले होते. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ती पसार झाली आहे. तिच्या अटकेसाठी दोन्ही जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.संशयित राज्याबाहेर पळाले?या गुन्ह्यातील मुख्य संशयितांचे मोबाइल नंबर बंद आहेत. ते राज्याबाहेर पळाल्याचा पोलिसांना संशय आहे. मुख्य आरोपी दादा पाटील महाराज आणि आण्णा नायक हे दोघे नेपाळच्या सीमेवर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांच्या अटकेसाठी लवकरच एक पथक रवाना होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Kolhapur: करणी प्रकरणात सिंधुदुर्गच्या महिला पोलिसाचा सहभाग, कॉन्स्टेबल तृप्ती मुळीक पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:20 PM