कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्ताने वर्षातून एकदा या दिवशी अंबाबाईच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरून दर्शन बंद ठेवले जाते. यंदा भाविक मंदिरात येत नसले तरी देवीची उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली.नवरात्रौत्सवास आता पाच दिवस राहिले आहेत. यंदा कोरोनामुळे भाविक नसले तरी देवीचे सर्व धार्मिक विधी परंपरेप्रमाणे पार पडणार आहेत. त्यामुळे आता देवस्थान समिती आणि मंदिरातही तयारीला वेग आला आहे. सध्या मंदिराच्या बाह्य परिसराची स्वच्छता सुरू असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी देवीच्या मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. यादिवशी देवीची मूळ मूर्ती दर्शनासाठी बंद असते.
पहाटेची काकड आरती आणि आठच्या अभिषेकानंतर मूर्तीला इरलं पांघरून झाकण्यात आले, तर उत्सवमूर्ती सजवून सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली. पुजारी व देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी मिळून गाभाऱ्याची स्वच्छता केली. साफसफाई पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा देवीचा अभिषेक करून सालंकृत पूजा बांधण्यात आली.