कोल्हापूर : येथील त्वचारोग व सौंदर्यतज्ज्ञ डॉ. इरफाना पाटील या ‘मिसेस वेस्ट इंडिया २०१९’च्या मानकरी ठरल्या आहेत. पुणे येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत त्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे, अशी माहिती डीआयडी फौंडेशनचे मार्गदर्शक व हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सचिन पाटील यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.डॉ. सचिन पाटील म्हणाले, पुणे येथे दि. २१ एप्रिल रोजी दिव्या प्रिव्हेंजतर्फे सौंदर्य स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र, गोवा, गुजरात, आदी राज्यांतून सुमारे ३०० स्पर्धक सहभागी झाले. त्यांतील ३२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. त्यामध्ये बाजी मारत डॉ. इरफाना यांनी ‘मिसेस वेस्ट इंडिया २०१९’ आणि ‘बेस्ट ब्यूटीफुल स्किन’चा किताब पटकविला. त्यांना या किताबाचा मुकुट, स्मृतिचिन्ह आणि गिफ्ट व्हाउचर अभिनेता अमन वर्मा यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी राजीव कौशल, दिव्या प्रिव्हेंजचे अंजना आणि कार्ल मस्कारेहान्स, आदी उपस्थित होते.डॉ. इरफाना पाटील म्हणाल्या, या स्पर्धेसाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी केली. त्यामध्ये आहार, फिटनेस, व्यासपीठावरील संवाद, आदींचा समावेश होता. या स्पर्धेतील यशामुळे माझे व्यक्तिमत्त्व विकसित झाले असून आत्मविश्वास वाढला आहे. युवती आणि विवाहित महिलांचा व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे. माझ्या यशात पती डॉ. सचिन यांच्यासह कुटुंबीयांचा मोलाचा वाटा आहे. या पत्रकार परिषदेस डीआयडी फौंडेशनचे सचिव मॅडी तामगावकर उपस्थित होते.महिलांनो, स्वत:साठी वेळ काढाविवाहानंतर अनेक महिलांचे त्यांच्या छंद, ‘पॅशन’कडे दुर्लक्ष होते. त्यांनी स्वत:साठी वेळ काढावा, छंद जोपासावेत, करिअरच्या दृष्टीने पाहिलेली स्वप्ने साकारावीत, असे आवाहन डॉ. इरफाना पाटील यांनी केले.
इरफाना पाटील यांनी पटकाविला ‘मिसेस वेस्ट इंडिया’ किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:44 AM