कोल्हापूर : आॅस्ट्रीया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या ११ स्पर्धकांनी सहभाग घेत, ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार करीत कोल्हापूरचे नाव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. या स्पर्धकांचे रविवारी सकाळी कोल्हापुरातील ताराराणी चौकात प्रथमच आगमन झाल्यानंतर त्यांचे आयर्नमॅन सत्कार समितीतर्फे जयेश कदम यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले.या स्पर्धेत जगभरातून २७ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी १३ स्पर्धक हे कोल्हापुरातील होते. यात उत्तम फराकटे, अतुल पवार, स्वप्निल कुंभारकर, वैभव बेळगावकर, बसवराज येंटापुरे, यश चव्हाण, वीरेंद्रसिंह घाटगे, बाबासाहेब पुजारी, वरुण कदम, अमर धमाणे, अविनाश सोनी, कुमार ब्रिजवाणी, उदय पाटील यांचा समावेश होता.
यात ३.८ कि. मी. जलतरण, १८२ कि. मी. सायकलिंग व ४२.२ कि. मी. धावणे हे संपूर्ण १७ तासांच्या आत पूर्ण केल्यानंतर ‘आयर्नमॅन’चा किताब बहाल केला जातो. या स्पर्धेत ११ जणांनी ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार केली. या स्पर्धकांना नीळकंठ आखाडे (जलतरण), धीरज व पंकज रावळू व अश्विन भोसले यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच मागील वर्षीचे आयर्नमॅन चेतन चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
छत्रपती ताराराणी यांच्या पुतळ्याजवळ झालेल्या स्वागताप्रसंगी एस. आर. पाटील, चेतन चव्हाण, डॉ. प्रांजली धमाणे, अॅड. राजेंद्र किंकर, सचिन तोडकर, दिलीप देसाई, राजू लिंग्रस, बाळासाहेब मुधोळकर, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, अश्विन भोसले, संजय कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.