कोल्हापूर : वीज बिले भरण्यावरून महावितरणकडून सुरु असलेल्या दंडुकेशाहीच्या विरोधात उद्या शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलनाची हाक दिली आहे. यात राज्य इरिगेशन फेडरेशननेही पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर यांनी सांगितले.
शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रीय महामार्गावर पंचगंगा नदी पुलावर रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वपक्षीयांनी सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत इरिगेशन फेडरेशनने बुधवारी आपली भूमिका जाहीर केली. हे आंदोलन गांधीगिरी मार्गाने आणि कोराेनाचे सर्व नियम पाळूनच केले जाणार आहे. जनतेच्या न्याय मागण्यासाठी हे आंदोलन होत असल्याने आणि संपूर्ण काळजी घेऊनच केले जाणार असल्यानेही यातही प्रशासनाने खोडा घालू नये, अन्यथा जनतेच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही किणीकर यांनी दिला आहे.