कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे पुन्हा ईडीने छापा टाकला. सुमारे 26 अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. लोकांची घराबाहेर गर्दी असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. माजी नगराध्यक्ष व मुश्रीफ यांचे उजवे हात समजले जाणारे प्रकाश गाडेकर यांच्या घरीही छापा पडला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर खळबळ उडाली असून हसन मुश्रीफ हे बाहरेगावी आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच, एका विशिष्ठ जाती-धर्माच्या व्यक्तींवरच कारवाई होतेय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुश्रीफांविरुद्ध वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यातूनच ही कारवाई झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, मुश्रिफ यांनीही राजकीय हेतुने ही कारवाईचा होत असल्यास त्याचा निषेधच केला पाहिजे, असे म्हटले आहे. माझ्या घरी, माझ्या मुलीच्या घरावर, नातेवाईंकांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे. मी कामानिमित्त बाहेरगावी असून मला फोनवरुन यासंदर्भात माहिती मिळाली. कारखाना, निवासस्थान आणि सगळ्या नातेवाईकांची घरं तपासण्याचं काम सुरू आहे. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंतीय की, त्यांनी शांतता ठेवावी. मी कागल बंद ठेवण्याची जी घोषणा केली होती, ती कृपया मागे घ्यावी. त्या सरकारी अधिकाऱ्यांना संपूर्ण सहकार्य करावे. कायदा सुव्यवस्था मोडेल अशी कुठलीही गोष्ट आपण करु नये, असे आवाहनही मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
वास्तविक ३० ते ३५ वर्षातील माझं सार्वजनिक क्षेत्रातील जीवन आहे, यापूर्वीही २ वर्षांपूर्वी ईडीने माझ्याकडे तपासणी केली होती, तेव्हाही काही सापडलं नाही. ४ दिवसांपूर्वीच कागल तालुक्यातील भाजपचे नेते दिल्लीत चकरा मारुन माझ्याबद्दल तक्रारी करत होते. तसेच, माझ्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचंही ते सांगत होते. अशाप्रकारे नाउमेद करण्याचं काम जे चाललंय, ते अतिशय गलिच्छ राजकारण असल्याचं मुश्रिफ यांनी म्हटलं. तर, यापूर्वी नबाव मलिक यांच्यावर कारवाई झाली, आता माझ्यावर कारवाई होतेय. किरीट सोमय्या म्हणातंयत अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होणार आहे. म्हणजे विशिष्ठ जाती-धर्माच्या व्यक्तींवर ही कारवाई होतेय का काय? असा प्रश्नही हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे.