कोल्हापूर : सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात केलेले निवेदन धादांत खोटे आणि चुकीचे आहे, असा आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला. सरकारने आत्तापर्यंत वाघनखे संदर्भात काढलेल्या शासन आदेशात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे असा स्पष्ट उल्लेख केला आहे. मग मंत्रिमहोदय डोळे झाकून शासन आदेश काढतात का? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केला. मंत्री मुनगंटीवार हे कशाप्रकारे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत याची कागदपत्रे पुरावेच त्यांनी सादर केले. जी वाघनखे भारतात आणली जाणार आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत, असे स्पष्टीकरण म्युझियमकडून देण्यात आल्याचे सावंत यांनी नुकतेच सांगितले होते.यानंतर मंत्री मुनगंटीवार यांनी सभागृहात वाघनखे आणण्यासाठी झालेल्या खर्चाची माहिती दिली. ही माहिती देताना यासाठी फारसा खर्च झालेला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीने लंडनमधून आणली जाणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा दावा कोणी केला नाही, असे सांगितले. पण इतिहासाचा अभ्यास नसलेला सांस्कृतिकमंत्री महाराष्ट्राला मिळाल्याची टीका सावंत यांनी केली. वाघनखाबाबतीत मुनगंटीवार सभागृहात धडधडीत खोट बोलले आहेत. याबाबत त्यांनी कोणतेही पुरावे न देता सभागृहात माहिती दिली. जर त्यांच्याकडे पुरावे नसतील तर तसे सांगावे, पण जनतेची फसवणूक करू नका, असे सावंत यांनी बजावले.या संबंधित काढण्यात आलेल्या शासन आदेशातच लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे म्हटले आहे. यासाठी सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याचाही उल्लेख आदेशात आहे. पण मुनगंटीवार वाघनखासाठी फारसा खर्च झाला नसल्याची चुकीची माहिती देत लोकांची दिशाभूल केली. राज्यातील सरकार भारतात तोतया वाघनखे आणत असल्याचा आरोप करत सावंत यांनी केला. याप्रकरणी महाराष्ट्राची फसवणूक होऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी विरोधी पक्षांना केले.
वाघनखाबाबतचा आदेश डोळे झाकून काढला आहे का?, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 1:29 PM