- विश्वास पाटीलकोल्हापूर : तुमची जात कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का? कुटुंबात कोण आजारी पडले तर त्यास लवकर आराम पडावा म्हणून दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे आदी प्रकार करता काय, अशी विचारणा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्यावतीने केल्या जात असलेल्या मराठा व इतर खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षणातून केली जात आहे.
मंगळवारपासून राज्यभरात हे सर्वेक्षण सुरू झाले. त्यासाठी १५४ प्रश्न, तीन तक्ते व तब्बल ३५ पानांची प्रश्नावली आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्यातील अनेक प्रश्न नवे वाद निर्माण करणारे आहेत. शिक्षक, ग्रामसेवक आणि परिचारिकांच्या मदतीने हे सर्वेक्षण ३० जानेवारीपर्यंत संपवण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईकडे कुच केल्याने हे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू आहे.
चुकीची माहिती दिल्यास...प्रश्नावलीमध्ये कौटुंबिक प्रश्न, आर्थिक, सामाजिक स्थितीशी संबंधित प्रश्न आहेत. कुटुंबातील सदस्यांची माहिती व शिक्षण स्थितीचे तक्ते भरून घ्यायचे आहेत. ही प्रश्नावली कुटुंबप्रमुखाकडून भरून घेतली जाणार आहे. त्यात खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास त्याच्या परिणामास तुम्ही जबाबदार राहाल, असाही इशारा दिला आहे.
उपचारासाठी कोणाकडे जाता?सर्वेक्षणात कुटुंबातील कुणाला कुत्रा-माकड, साप-विंचू चावल्यावर किंवा कावीळ झाल्यावर कुणाकडे उपचाराला घेऊन जाता, या प्रश्नाला पहिला पर्याय तांत्रिक-मांत्रिकाचा दिला आहे. दुसरा पर्याय घरगुती उपचार आणि तिसरा पर्याय डॉक्टरचा दिला आहे. असे प्रश्नही विचारले आहेत.
काही प्रश्न असेही विचारले... तुमच्या समाजात लग्नामध्ये हुंडा देण्याची पद्धत आहे का, विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का, विधूर पुरुषांचे आणि विधवांचे पुनर्विवाह होतात का, विधवांना शुभकार्यात बोलावले जाते का, त्यांना हळदी-कुंकवाचा मान दिला जातो का, विवाहित स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे असे बंधन आहे का, मुलीच्या विवाहाचा निर्णय कोण घेते, अशी विचारणा ही प्रश्नावली करते. नवसाला कोंबड्या-बकऱ्याचा बळी देण्याची पद्धत आहे का, असेही त्यामध्ये विचारले आहे.