कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीशेजारी ‘आयसोलेशन डे’साठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो तांत्रिक मंजुरीसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.कोल्हापूरची विमानसेवा २०१० पासून बंद आहे. सध्या केवळ छोट्या आकाराचीच विमाने दिवसा उतरू शकतात. मोठ्या विमानांचे ‘टेक आॅफ’ होण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. अशा सूचना भारतीय विमान प्राधिकरणने दिल्या आहेत. त्यासाठी जमीन अधिग्रहणाला सुरुवात झाली असून स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रश्न रखडला आहे. आतापर्यंत २२३ हेक्टर जमीन संपादन करून प्राधिकरणकडे वर्ग केली आहे; परंतु आपत्कालिन परिस्थितीत विमान बाजूला लावण्यासाठी ‘आयसोलेशन डे’करीता १० एकर जमीन आवश्यक आहे; परंतु जमीन संपादनाचा मुद्दा कळीचा बनला आहे. गडमुडशिंगीच्या जागेवर वनखात्याचे आरक्षण असल्याने ही प्रक्रिया गुंतागुंतीची बनली आहे.यावर पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी ‘आयसोलेशन डे’ धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला करता येते का? हे तपासण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर धावपट्टीच्या दुसऱ्या बाजूला गरजेइतकी जमीन उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव तयार करून तो तांत्रिक मंजुरीसाठी पाठविला आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, ही मंजुरी मिळाल्यानंतर ‘आयसोलेशन डे’ चे काम सुरू होईल. त्यानंतर विमान सेवा सुरू होण्यास गती येणार आहे. (प्रतिनिधी)‘आयसोलेशन डे’ म्हणजे काय?विमानतळावर आपत्कालीन परिस्थितीत विमान धावपट्टीशेजारी थांबविण्यासाठी तयार केलेली विशेष जागा म्हणजे ‘आयसोलेशन डे’ होय. या ठिकाणी विमान लावून धावपट्टी इतर विमाने धावण्यासाठी उपलब्ध केली जाते.
विमानतळासाठी ‘आयसोलेशन डे’
By admin | Published: August 11, 2016 1:06 AM