कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गृह बांधणी परवाने देण्याचे काम एकत्रित बसून करावे अशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले होते. त्यानुसार या कामास सोमवारपासून सुरवात झाली. ही प्रक्रिया किमान आठ ते दहा दिवस लागणार आहेत, अशी माहिती महानगरपालिकेच्या नगररचना विभागातून देण्यात आली.
गेल्या एक दीड महिन्यापासून निवडणूक मतदार याद्या तयार करण्यात नगररचना विभागाचे सर्व कर्मचारी सक्रिय होते. त्यामुळे त्यांचे दैनंदिन कामाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी त्यांच्याकडून नवीन गृह प्रकल्पांना मंजुरी देण्याचे काम प्रलंबित राहिले होते. याबाबत बांधकाम व्यावसायिकांची अडचण लक्षात घेऊन ‘लोकमत’ने त्यासाठी पाठपुरावा केला. तेव्हा प्रशासक डॉ. बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यात लक्ष घालून लवकरात लवकर बांधकाम परवाने देण्याचे काम हाती घ्या, अशी सूचना केली होती.
नगररचना विभागाचे सर्व कर्मचारी, अधिकारी सोमवारी आपल्या कार्यालयात गेल्यानंतर प्रशासक बलकवडे यांच्या सूचनेनुसार प्रलंबित बांधकाम परवानगी मागणीच्या फाईल्सची माहिती घेतली. सहायक संचालक रामचंद्र महाजन यांच्यासमोर सर्व अधिकारी, अभियंता यांनी कोणती फाईल का प्रलंबित आहे, त्यात काही त्रुटी आहेत का याची माहिती घेतली. पुढील आठ ते दहा दिवसांत संबंधित बांधकाम व्यावसायिक यांना बरोबर घेऊन त्या त्या फाईलवर निर्णय घेतला जाणार आहे. ज्या फाईलबाबत काही अडचणी नसतील तर चलन भरून घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार आहे.