कोल्हापूर : विविध विभागांशी संबंधित होणाऱ्या ठरावांच्या अंमलबजावणीचा मुद्दा शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेमध्ये (सिनेट) बुधवारी रंगणार आहे. या बैठकीत विद्यार्थी कल्याण मंडळ, क्रीडा अधिविभाग, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आदींच्या वर्षभरातील कामगिरीच्या अहवालांचे सादरीकरण होणार आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या कारकीर्दीतील ही पहिली सभा असणार आहे.या वर्षातील पहिली अधिसभा मार्चमध्ये झाली होती. त्यात क्रीडा अधिविभागाच्या कारभाराचा पंचनामा झाला होता. अंदाजपत्रकही सादर झाले होते. आता दुसरी अधिसभा बुधवारी होणार आहे.
प्रत्येक अधिसभेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांच्याशी संबंधित विविध स्वरूपातील ठराव मांडले जातात. त्यावर चर्चा होऊन काही ठराव मंजूर होतात. मात्र, त्यातील बहुतांश ठरावांची अंमलबजावणी रखडते. काहीवेळा त्याबाबत टाळाटाळ होते, तर अंमलबजावणीची गती अपेक्षित स्वरूपात नसते. ठरावांबाबतच्या मुद्द्यावरून अधिसभेमध्ये बुधवारी चर्चा रंगणार आहे.विद्यापीठ, महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती, खोटी माहिती देऊन विद्यापीठाची बदनामी करणे, आदी विषयांवरून वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने काही ठराव यावेळी मांडण्यात येणार आहेत. लेखापरीक्षणाचा अहवालही सादर होणार आहे.