अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे सरकारने प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष घालावे; अन्यथा सर्वच गावांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या नदीतून पाणी आणण्याच्या योजना मंजूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.प्रयाग चिखली (ता. करवीर) येथून निघालेली पंचगंगा ६७ किलोमीटरचा प्रवास करीत शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथे कृष्णा नदीत मिसळते. कोल्हापूर शहराच्या वरील गावांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळते. मात्र, तेथून गांधीनगरपासून नृसिंहवाडीपर्यंत २६ गावांतील तीन लाख ४८ हजार ९४६ लोकांना प्रदूषित व मैलामिश्रित पाणी प्यावे लागते. यामध्ये इचलकरंजी शहराची लोकसंख्या अधिक केल्यास सुमारे साडेसहा लाख लोक प्रदूषित पाणी पितात. रुई (ता. हातकणंगले) बंधाºयानंतर नृसिंहवाडीपर्यंतच्या १७ गावांना, तर प्रदूषणाची तीव्रता वाढलेले पाणी मिळते आणि इचलकरंजी शहरापासून नृसिंहवाडीपर्यंतच्या १४ गावांना अतिप्रदूषित पाणी प्यावे लागते, ही सध्याची परिस्थिती आहे. त्याचबरोबर ५७ गावांतील बारा हजार ३२५.२२ हेक्टर जमिनीतील पिकांना प्रदूषित पाणी दिले जाते. त्यामुळे जमिनी खराब होणे, तसेच प्रदूषित पाण्यातून उत्पादित झालेली पिके, भाजीपाला खाल्ल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे.रुई बंधाºयानंतर लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषित व रसायनमिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीमध्ये मिसळते. त्यानंतर इचलकरंजीतील इंडस्ट्रियल इस्टेट, काही प्रोसेसर्स, पंचतारांकित औद्योगिक वसाहत यामधून औद्योगिक सांडपाणी सोडले जाते. त्याचबरोबर साखर कारखान्यांमधूनही सांडपाणी पंचगंगा नदीमध्ये मिसळले जाते. राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्थेच्या (निरी) माध्यमातून शासनाने प्रदूषणाबाबतचा अहवाल मागविला होता. त्यानुसार ‘निरी’ ने सन २०१४ साली १३ तपासण्या व प्रत्यक्ष भेटी देऊन सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला आहे. त्या अहवालात कोल्हापूर महानगरपालिका ५२ टक्के, इचलकरंजी नगरपालिका २३ टक्के जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर प्रदूषण करणारे घटक, प्रदूषणाची तीव्रता, परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तरीही आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही.परिणामी, पंचगंगा नदीतील पाणी पिण्यापेक्षा २०-२५ किलोमीटर लांब असलेल्या वारणा, दूधगंगा, कृष्णा या नद्यांमधून पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी इचलकरंजीसह पंचगंगा नदीकाठच्या अनेक गावांनी योजना राबविल्या आहेत. यामध्ये यड्राव, तारदाळ, हातकणंगले, आळते, कोरोची, खोतवाडी, मजले, टाकवडे, हुपरी, रेंदाळ, तामगाव, वसगडे, उचगाव, गडमुडशिंगी, कुरुंदवाड, हेरवाड, शिरोळ, कोंडिग्रे, जांभळी अशा अनेक गावांचा त्यामध्ये समावेश आहे.अन्य नद्यांमधून पाणी आणून ते पिण्यासाठी, तसेच औद्योगिक कारणासाठी वापरून प्रदूषित झालेले पाणी व गावातील सांडपाणी पंचगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे पंचगंगेच्या प्रदूषणात आणखीनच वाढ होते. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणमुक्त करा, अन्यथा उरलेल्या सर्व गावांनाही अन्य नद्यांतून पाणी आणण्यासाठी योजना मंजूर करा, अशीही मागणी होत आहे.
पंचगंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर : सव्वीस गावांत दूषित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 11:10 PM
अतुल आंबी।इचलकरंजी : शहराला वारणा नदीतून पाणीपुरवठा योजना, त्याला वारणाकाठचा होणारा विरोध या पार्श्वभूमीवर पुन्हा पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त झाल्यास इचलकरंजीसह नदीकाठच्या सर्वच गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. त्यामुळे सरकारने प्रदूषणमुक्तीकडे गांभीर्याने लक्ष घालावे; अन्यथा सर्वच गावांना शुद्ध पाण्यासाठी दुसऱ्या नदीतून पाणी आणण्याच्या ...
ठळक मुद्देप्रदूषणमुक्त झाल्यास सर्वच गावांचा पाण्याचा प्रश्न मिटेल