लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील नगरपालिकेची शुक्रवारची स्थायी समितीची बैठक वादळी ठरली. या बैठकीदरम्यान घेतलेल्या मतदानामध्ये भाजप-शाहू आघाडीच्या बाजूने बहुमत सिद्ध झाले, तर आवाडे गटास मताधिक्य राखता आले नाही. यामुळे सत्ताधारी घाटामध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून आले.
इचलकरंजी नगरपालिकेची स्थायी समितीची विविध विषयांवर बैठक पार पडली. नगरपालिका इमारतीमधील खोल्या भाड्याने देण्याचा विषय क्रमांक १० मध्ये नोंदविला होता. यामध्ये जुन्या नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाजवळील खोली भाडेतत्त्वावर देण्याचा विषय होता. यावेळी अन्य विषय मंजूर केले. मात्र, सत्ताधाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याने भाजपचे पक्षप्रतोद तथा उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी हा विषय नामंजूर करण्यासाठी, तर आवाडे गटाच्या सदस्यांनी मंजूर करण्याचा आग्रह धरला. चर्चेअंती मतदान घेण्याचे ठरले. यामध्ये नगराध्यक्षा अलका स्वामी, उपनगराध्यक्ष पोवार, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, नगरसेवक मनोज साळुंखे, नगरसेविका सारिका पाटील या सदस्यांनी सदरचा विषय नामंजूरच्या बाजूने मतदान केले, तर आवाडे गटाचे आरोग्य सभापती संजय केंगार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक सागर चाळके, नगरसेविका शकुंतला मुळीक यांनी विरोधी मतदान केले. यामुळे हा विषय ५ विरोधी ४ मताने नामंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे सत्ताधारी गटातील वातावरण तापले होते.