लोकमत न्यूज नेटवर्क-कोल्हापूर : महानगरपालिकेतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी हेच आस्थापनातील अधिकारी असल्याने वारसा हक्काची नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडून २५ ते ७५ हजार रुपयांचे हप्ते मागतात. यासाठी महापालिकेत एजंटांची साखळीच कार्यरत असल्याचा आरोप महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी करण्यात आला. यावर सविस्तर चर्चा झाल्याने कर्मचारी सोसायटीच्या कर्जासाठी येथून पुढे ‘ना हरकत’ दाखला न देण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला. सेवानिवृत्त होऊन दीड वर्षे झाले तरी हक्काची ग्रॅच्युईटीची रक्कम न मिळाल्याने मारुती कांबळे या महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने आजारी अवस्थेत पत्नी, मुलासह महापालिकेसमोर केलेल्या उपोषणाकडे संतोष गायकवाड यांनी लक्ष वेधले. त्यावर कर्मचारी संघटनेतील पदाधिकाऱ्यांवर अनेक सदस्यांनी आरोपांच्या तोफा डागल्या. कर्मचारी संघटनेतील पदाधिकारी ‘व्हाईट कॉलर’ असून, ते संघटनेच्या कार्यालयात बसून महापालिकेचा पगार घेतात, अशीही टीका केली. तर अनेक पदाधिकारी हे आस्थापनात अधिकारी असून, ते वारसा हक्काची नोकरी लावण्याबाबत २५ ते ७५ हजारांपर्यंत हप्ते घेतात, अशी एजंटांची साखळी कार्यरत असल्याचाही आरोप काही सदस्यांनी केला. त्याचा धागा पकडत सत्यजित कदम यांनीही आपल्यावर काही दिवसांपूर्वी झाडू कामगार महिलेने आरोप केल्याचे सांगून त्याबाबत मुख्य आरोग्याधिकारी विजय पाटील यांना खुलासा करण्यास भाग पाडले.भागातील झाडू कामगार महिलेला कदम यांनी काम सांगितले. तिने यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांचे वशिले सांगितले. त्यासाठी तिला बोलवून समज देण्यात आली होती, असा खुलासा विजय पाटील यांनी केला. तर याच महिलेला कर्मचारी संघटनेने हाताशी धरून अत्याचाराची तक्रार आपल्यावर देण्यास भाग पाडल्याचे सत्यजित कदम यांनी सांगितले. संबंधित महिलेने लिहिता वाचता येत नाही त्यामुळे आपला अंगठा घेतल्याचे सांगितले. तसा खुलासाही त्या महिलेने पोलिसांत केला. त्यामुळे या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चाप बसला पाहिजे, असेही कदम म्हणाले. त्यामुळे येथून पुढे कर्मचारी सोसायटीस महापालिकेकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र न देण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला.मारुती कांबळेंची ग्रॅच्युईटी रक्कम तीन दिवसांतमारुती कांबळे यांची ग्रॅच्युईटीची रक्कम ८४ हजार रुपये असून, ती येत्या तीन दिवसांत देऊ. तसेच त्यांची सेवेतील दहा वर्षे पूर्तता न झाल्याने त्यांना पेन्शन देता येत नसल्याचा खुलासा सहायक आयुक्त संजय भोसले यांनी केला.संजय कांबळेंवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणारमारुती कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्याकडून संस्थेतील थकबाकी भरण्याबाबत महापालिकेस पत्र दिले. पत्रानंतर मारुती कांबळे यांचा मुलगा संजय कांबळे यांनी आमच्या संस्थेतून कर्ज घेऊन वडिलांची थकबाकी जमा केली; पण त्यांचे स्वत:चे कर्ज थकीत गेले; पण संजय कांबळे यांनी ही वस्तुस्थिती लपवून खोटी माहिती देऊन बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केला. त्याबद्दल त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा खुलासा कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने देण्यात आला आहे.
सोसायटीस ‘ना हरकत’ दाखला देणे बंद
By admin | Published: May 20, 2017 12:28 AM