कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या दोन दिवसीय ‘इज्तेमा’स बुधवारी कागल येथे प्रारंभ झाला. दोन-तीन दिवसांपासूनच मुस्लिम बांधव या ठिकाणी येत असून, बुधवारी मोठी गर्दी झाली होती. आज, गुरुवारी ईशाच्या संध्याकाळच्या नमाजाआधी सामुदायिक प्रार्थना (दुआँ) होऊन इज्तेमाची सांगता होणार आहे.इज्तेमाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख जिम्मेदारांचे प्रवचन (बयान) झाले. दुपारी जोहरच्या नमाजनंतर हाजी युसूब एस. टी. (पुणे) यांचे बयान झाले, तर सायंकाळी मौलाना वजीरभाई (नांदेड) मगरीबच्या नमाजनंतर मौलान मुबीनसाहब यांचे बयान झाले. या सर्वांनी इस्लाम धर्माची शिकवण, हजरत महंमद पैगंबरांची शिकवण, सर्वश्रेष्ठ अल्ला आणि पवित्र कुराणाचा दिव्य संदेश याची माहिती देऊन आजच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनशैलीतील समस्या आणि त्या सोडविण्यासाठी देवाच्या रस्त्यावर मार्गक्रमणा कशी करावी, याबद्दल उपदेश केला. दिवसभरामध्ये बयान, कुराणपठण, नामस्मरण, सामुदायिक नमाज असे भक्तिपूर्ण कार्यक्रम सुरू होते. आजही प्रमुख जिम्मेदारांचे मार्गदर्शन होणार आहे. तबलीम जमातचे महाराष्ट्राचे प्रमुख जिम्मेदार हाफीज मंजूरसहाब (पुणे), मौलाना शोएब (मुंब्रा), मौलाना मुर्शक, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.जवाहर नवोदय विद्यालयाच्या समोरील भव्य माळरान गर्दीने फुलून गेले आहे. या इज्तेमामध्ये कोणतीही प्रसिद्धी अथवा नावाचे प्रदर्शन केले जात नाही. आलेल्या भाविकांना जेवणापासून सरबत, दूध, कोल्ंिड्रक्स, केळी, द्राक्षे, कलिंगड असे विविध पदार्थांचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे प्रमुख कार्यकर्ते, नेतेही सामान्य भाविकांप्रमाणेच येथे वावरत आहेत.आज सांगताइज्तेमासाठी हजर न राहू शकलेले शेवटच्या दिवशी असणाऱ्या सामुदायिक प्रार्थनेसाठी (दुआँ) हजर राहत असतात. दोन दिवसांच्या भक्तीनंतर परमेश्वराकडे सर्वजण मिळून प्रार्थना करतात. ही दुआँ आज, गुरुवारी ईशाच्या नमाजापूर्वी होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.विविध संस्थांचा सहभागया इज्तेमासाठी गोकुळ दूध संघ, बिद्री साखर कारखाना, भोगावती साखर कारखाना, कोल्हापूर महानगरपालिका, कागल नगरपरिषद यांचे पाण्याचे टॅँकर पाणीपुरवठा करीत आहेत. शाहू दूध संघाचा स्टॉल आहे. मुश्रीफ फौंडेशनची रुग्णवाहिका, कागलमधील डॉक्टरांनी तात्पुरता दवाखानाही उघडला आहे. प्रत्येक तालुकानिहाय आणि कागल तालुक्यातील प्रमुख गावांतील मुस्लिम समाजाने विविध कामे वाटप करून घेतली आहेत.
कागलमध्ये इज्तेमास प्रारंभ
By admin | Published: March 25, 2015 11:57 PM