कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य कीटकनाशक विभागामार्फत शहरातील विविध भागात डेंग्यू, चिकुनगुण्या साथरोग नियंत्रणाकरिता डास-अळींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २६७७ घरे तपासण्यात आली, तर या घरात वापरासाठी साठविण्यात येणाऱ्या ४६५५ कंटेनर पैकी २२ कंटेनरमध्ये डास-अळी आढळल्या. दूषित आढळलेल्या ठिकाणी अळीनाशक टाकण्यात आले आहे.
मंगळवारी ई वाॅर्डातील धरतीमाता कॉलनी, लिशा हॉटेल, पर्ल्स हॅास्पिटल, आंबेडकर नगर, जातपडताळणी ऑफिस, पत्रकार नगर, संजय गांधी, गायकवाड हौ. सोसा., भंडारी गल्ली, मेथे गल्ली, कपूर वसाहत, कामगार चाळ, कदमवाडी, सह्याद्री सोसा., मदारी वसाहत, माळ गल्ली, कोपार्डे गल्ली, यशोदा पार्क, कारे मळा, शिवराज कॉलनी, गजानन कॉलनी, वैशाली अपार्ट., धुमाळ कॉलनी, गव्हर्न्मेंट कॉलनी, दत्त हौ. सोसायटी, आदी ठिकाणी डास-अळीचे सर्वेक्षण करण्यात आले.
महानगरपालिकेमार्फत वारंवार जनजागृती करूनही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून जनजागृती करूनदेखील पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करावे लागत आहे. डेंग्यू, चिकुनगुण्या यासारख्या आजारांना पळवून लावायचे असेल तर घराघरांत नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, असे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.
- काय करायला पाहिजे -
- सेप्टिक टँक व्हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी
- पाण्याचे पिंप, भांडी भरून एक दिवस कोरडा पाळण्यात यावा.
- फ्रिजमधील डिफ्रॉस ट्रे मधील पाणी आठ दिवसांतून एकदा रिकामे करावे.
- घराजवळील रिकामे टायर्स्, नारळाच्या करवंटया, डबे यात पाणी साठू देऊ नये.
- डास प्रतिबंधक कॉईल तथा क्रिम वापरावी.