पाटण : नऊ महिन्यांच्या पुतणीला सांभाळायचा कंटाळा आलेला, त्यातच ती सारखीच आजारी पडायची; दुसरीकडे पुतणीच्या आईस जिवंत जाळल्याप्रकरणी स्वत:चा सख्खा भाऊ, आई, वडील जेलमध्ये, त्यांची सुटका करण्यासाठी जामिनाची धडपड, पुतणी सारखी रडायची तिच्या दुधासाठी पैसे खर्च व्हायचे, यासर्व कारणांमुळे चुलता, चुलतीचे हात पुतणीचा गळा दाबण्यास सरसावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, खूनप्रकरणी तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर चुलता रवींद्र साळुंखे व चुलती मंदा यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.कोयना विभागातील गुनुगडेवाडी गावात बालिकेचा खून करण्यात आल्याची घटना पाच महिन्यांनंतर मृतदेहाचा व्हिसेरा आणि पोलिसांच्या सतर्कमुळे उजेडात आली. त्यानंतर कोयना पोलिसांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व उपाधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेतला असता, बालिका आजारपणाने मृत्यू झाल्याची खोटी फिर्याद देणाऱ्या चुलत्यास खुनी म्हणून अटक करण्यात आले. त्याअगोदर पुतणीच्या आईचा जाळून बळी घेतला गेला होता. हे कृत्य गुनुगडेवाडीतील घरा पाठीमागेच केले गेले. या प्रकरणात पती, सासू, सासरा, शिक्षा भोगत आहेत. त्यानंतर एकटी उरलेल्या नऊ महिन्यांच्या बालिकेचा सांभाळ करण्याची जबाबदारी साहजिकच चुलता रवींद्र व चुलती मंदावर आली. मुलगी लहान असल्यामुळे आणि आईची सावली हरविल्यामुळे सारखी रडायची, आजारी पडायची, दुधाचा खर्च चुलत्यावर पडला. यावर उपाय म्हणून कठोर चुलता-चुलतीने बालिकेचा गळा दाबून तिला संपविले. (प्रतिनिधी)गुन्ह्याची कबुली...बालिका खूनप्रकरणी अटक केलेल्या गुनुगडेवाडी येथील दोन आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. दरम्यान, ती सारखी रडायची, आजारी पडायची यास कंटाळून तिचा गळा दाबल्याची कबुली आरोपींनी दिली.
दुधाचा खर्च वाचविण्यासाठी पुतणीचा गळा दाबल्याचे स्पष्ट
By admin | Published: February 09, 2015 10:02 PM