कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, जुलैमधील संभाव्य तिसरी लाट आणि लसीकरणाची स्थिती लक्षात घेता दि.१४ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करणे जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थीहित लक्षात घेवून दि. १५ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने मंगळवारी केली. त्याबाबतचे निवेदन या समितीच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना दिले.
पालक आणि विद्यार्थ्यांना दिलासादायक ठरणारा आदेश पुढील चार दिवसांत काढण्यात येईल. कृती समितीने दिलेले निवेदन शिक्षण विभागाला पाठविण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी लोहार यांनी सांगितले. शैक्षणिक वर्ष १५० दिवसांचे असावे. त्यामध्ये दोन परीक्षा घ्याव्यात. या नियोजनासाठी लागणाऱ्या अर्ध्या अभ्यासक्रमाची पुस्तके छपाई व्हावीत. त्यामुळे छपाई खर्च, वेळ वाचेल. पालकांची आर्थिक पिळवणूक थांबेल. शासन प्रत्यक्ष शैक्षणिक वर्ष जाहीर करत नाही. तोपर्यंत कोणत्याही शाळेला विद्यार्थ्यांकडून प्रवेश अथवा शुल्कासंदर्भात प्रक्रिया न राबवण्याच्या सक्त सूचना करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे नियोजन करावे, अशी मागणी या समितीने निवेदनाद्वारे केली. या शिष्टमंडळातील अशोक पोवार, रमेश मोरे, प्रमोद पुंगावकर, विनोद डुणुगं, चंद्रकांत पाटील, भाऊ घोडके, अंजूम देसाई यांनी शिक्षणाधिकारी लोहार यांच्यासमवेत चर्चा केली.