लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले. याच कार्यक्रमात शिवाजी चौक सुशोभिकरणाचे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असे सांगून पुढील टप्प्यात येथे आनंदोत्सव केंद्र उभारले जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणाच्या भूमीपूजन पायाभरणी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. प्रमुख उपस्थिती आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक ईश्वर परमार, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे यांची होती.
आ.क्षीरसागर यांच्या पुढाकाराने सुशोभिकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान सकाळी नऊ वाजता बिंदू चौक येथून जिल्ह्यातील ३३ गडकिल्लयांवरील पाणी, दगड, माती व तालीम संस्थांमधील माती तसेच जिल्ह्यातील १६ नद्यांमधील पाण्यांच्या कलशांची लेझीम, ढोलताशा, धनगरी ढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सेवक दांपत्याच्या हस्ते भूमिपूजन, शिवप्रतिष्ठानतर्फे शिवप्रेरणा मंत्र, मान्यवर महिलांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला.
शाहू छत्रपती म्हणाले, शिव-शाहूंचे विचार हे लोक हिताचे असल्याने ते चिरंतन असून संपूर्ण देश हे विचार पुढे नेत आहे. निव्वळ जय भवानी...जय शिवाजी...च्या घोषणा देऊन चालणार नाही तर समाजोपयोगी काम प्रत्येकाने हाती घेण्याची गरज आहे. आ. क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पुतळा सुशोभिकरणाचे ऐतिहासिक काम होत आहे.
आ. क्षीरसागर म्हणाले, शिवाजी चौक पुतळा सुशोभिकरणाचे काम सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन केले जात आहे. हे काम पाच महिन्यात पूर्ण करणाचा प्रयत्न आहे. हा पुतळा देशातील क्रमांक एकचा होईल. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आलेला आहे.
ते पुढे म्हणाले, पुढील टप्प्यात शिवाजी चौक परिसरात शिवरायांच्या काळातील विविध शिल्पे बसवून एक आनंदोत्सव केंद्र (सेलिब्रेशन सेंटर) उभारण्यात येणार आहे.
महापौर फरास यांनी पुतळा सुशोभिकरणाच्या कामासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल क्षीरसागर यांना धन्यवाद दिले.
यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी उपमहापौर उदय पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.
शपथ आहे तुम्हाला...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पवित्रता जपण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यामुळे कोणीही दारु पिऊन अथवा गुटखा, मावा खाऊन या पुतळ्याच्या कठड्याला स्पर्श करु नये, अशी शपथ आ. क्षीरसागर यांनी घातली. (छाया : दीपक जाधव)