शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार चळवळीच्या रथाची ही दोन चाके गतिमान होताना दिसत आहेत. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ हे मात्र नक्की!
सहकार चळवळीचा मूलभूत पाया शेतकरी व कामगार वर्गानेच घातला आहे. चळवळ यशस्वी व्हायची असेल, तर अशा पायाभूत काम करणाऱ्या घटकांना विश्वासात घेऊन काम करावे लागते, हा माझा अनुभव आहे. एकदा का विश्वास निर्माण झाला की, समन्वय साधता येतो. नवनवीन प्रयोग करताना या घटकांचा अधिक लाभ मिळतो. या घटकांकडे दुर्लक्ष झाल्यास चळवळीचा हेतू बिघडतो. सद्य:स्थितीला शेती उत्पादन हा विषय चिंतनाचा बनला आहे. दिवसेंदिवस शेतकºयांचे प्रश्न गंभीर स्वरूपाने पुढे येत आहेत, अशा प्रश्नांकडे पाठ फिरवून चालणार नाही. उदा. शिरोळ तालुक्यातील क्षारपड झालेल्या हजारो एकर नापिक जमिनी व या संकटातून आर्थिकदृष्ट्या हतबल झालेला शेतकरी हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही. याप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून आम्ही अशा शेतकºयांना एकत्रित करून जमीन क्षारपडमुक्त करण्याचा विडा उचलला आहे.
कामगार व कष्टकरी हा वर्ग उत्पादनाशी निगडित असला तरी सर्व क्षेत्रांंत येऊ पाहत असलेले अद्ययावत तंत्रज्ञान कामगारांना देऊन त्यांना प्रशिक्षित करण्याची गरज आहे. यासाठी त्यांची मानसिकता तयार करणे व दर्जेदार उत्पादनानंतर त्यांना त्याचा लाभ उपलब्ध करून देण्याचे काम योग्य वेळी झाले पाहिजे, ही माझी भूमिका आहे.- गणपतराव पाटील, अध्यक्ष श्री दत्त साखर कारखाना, शिरोळ.बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यातून आमचे प्रयत्नही सुरू आहेत. कामगार व कर्मचारी यांची नोकर वर्ग एवढीच व्याख्या न करता तेही समाजाचे महत्त्वपूर्ण घटक आहेत. प्रत्येकांशी संवाद साधण्याचे काम करीत राहिल्याने कामगार वर्गाशीही आमचे नेहमीच जिव्हाळ्याचे नाते तयार झाले आहे. कारण शेतकरी व कामगार यांच्या विश्वासावरच पुढे जायचे आहे. ते नेहमीच मनात ठेवून प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करावे लागेल, असे मला मनापासून वाटते.