कोल्हापूर : कोल्हापूरवर येणारे विचारांचे आक्रमण थोपविण्यासाठी तडजोड न करणाऱ्या ॲड. महादेवराव आडगुळे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलावडे यांनी गुरुवारी येथे काढले. नेत्यांचे ठरलंय परंतु कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधी एकत्र येणार, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरील सतेज पाटील, संजय मंडलिक व राजेश क्षीरसागर यांच्याकडे पाहून केली नंतर तिघांनीही आम्ही कोल्हापूरकरांसाठी एकत्रच असल्याची ग्वाही दिली.अमृतमहोत्सव आणि वकिली व्यवसायाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी महापौर आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष ॲड. आडगुळे यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश तानाजी नलावडे, शाहू महाराज, माजी पालकमंत्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनात शाल, श्रीफळ आणि पुष्पहार देऊन नागरी समितीमार्फत सत्कार करण्यात आला.निवृत्त न्यायाधीश नलावडे म्हणाले, आडगुळे यांनी राजकारण नव्हे समाजकारण केले पाहिजे. कोल्हापूरवर येणारे विचारांचे आक्रमण थोपविण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. शिव-शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचे कोल्हापुरातील नेते दुसऱ्या विचारांच्या दडपणाखाली तिकडे जात आहेत.शाहू महाराज म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीत वकील झालेल्या आडगुळे यांनी लोकांसाठी वकिली केली. महापौर म्हणून नागरिकांचेच हित पाहिले. खंडपीठ, थेट पाइपलाइनसारख्या सामाजिक प्रश्नातही ते कोल्हापूरकरांसाठीच रस्त्यावर उतरले.सत्काराला उत्तर देताना आडगुळे म्हणाले, माझ्यावर बुधवार पेठेचे संस्कार आहेत. माझी वकिली, माझे राजकारण कोल्हापूरकरांसाठी, सामान्यांसाठी पणाला लावले. वकिली केली, पण कोणाला नाडले नाही. राजकारण केले, पण कोल्हापूरचे प्रश्न मांडले.यावेळी सतेज पाटील, क्षीरसागर, खासदार मंडलिक, बार असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश खडके, ॲड. विवेक घाटगे, व्ही. बी. पाटील, हिंदकेसरी दीनानाथ सिंह, सुरेश कुऱ्हाडे, रमेश कुलकर्णी, आर. के. पोवार यांची भाषणे झाली. ‘प्रेरणा’ गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मिलिंद यादव यांनी प्रास्ताविक केले. आर. के. पोवार यांनी आभार मानले. अनिल घाटगे यांनी सूत्रसंचालन केले.हा कोल्हापुरी बाणा नव्हे..निवृत्ती न्यायाधीश नलवडे यांनी कोल्हापूरच्या नेत्यांवर सडकून टीका केली. शाहूंचे विचार मांडणाऱ्या पानसरेंचा खून होतोच कसा आणि कोल्हापूरकर पाहत कसे बसता, असा सवाल केला. हा कोल्हापूरचा बाणा नाही. नेत्यांनीही आपसांतील राजकारण बंद करावे. आडगुळे खंडपीठ आणि थेट पाईपलाईनविषयी आंदोलन करतात, मग राजेश आणि सतेज, तुम्ही पुढाकार घेऊन हा प्रश्न कधी सोडवणार, असा थेट सवालच त्यांनी स्टेजवरून केला.पत्नीच्या आठवणीने झाले भावनावशसमाजकारण करताना पत्नीने घर सांभाळल्याची कृतज्ञता व्यक्त करून, ती आज असती तर आनंद झाला असता असे बोलताना आडगुळे यांचा आवाज भरून आला.
नेत्यांचे ठरलंय, कोल्हापूरचं मात्र अडलंय.., माजी न्यायाधिशांनी टोचले कान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:44 PM