कोल्हापूर: पंधरा मिनिटांपूर्वी आलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे. शहराच्या आजूबाजूला काळे ढग जमा होवून अचानक सव्वा चार नंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या जोरदार सरी बरसत असल्यामुळे कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू झाली. मिरवणुकीमध्ये आणलेली मोठी ध्वनी यंत्रणा झाकून कशी ठेवायची या विवचनेमध्ये कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. मिरजकर टिकटी ते बिनखांबी गणेश मंदिर या परिसरामध्ये सध्या सहा ते सात महत्त्वाची मंडळे असून त्यांनी मोठी तैनात केली आहे.
गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत पावसाची हजेरी
या मिरवणुकीमध्ये आपल्या तालमीचा, मंडळाचा ठसा उमटवन्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करत असताना या पावसामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे. रात्रीच्या मिरवणुकीत तालीम चर्चेत आणायची अशा पद्धतीने या मंडळींनी नियोजन केलेले आहे. परंतु चार वाजून वीस मिनिटांनी सुरू झालेल्या पावसाने या ठिकाणी फार मोठा व्यत्यय आणलेला आहे. त्यामुळे एकीकडे गणपतीची मूर्ती झाकण्यापासून ते ध्वनी आणि प्रकाश यंत्रणा खराब होवू नये यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. सद्या पाऊस कमी असला तरी पावसाची रिमझिम उघडावी अशीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.