कोल्हापूर : अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी स्वयंशिस्तीसह कायद्याचे पालन व इतरांचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी व्यक्त केले.
संवेदना फाैंडेशन कोल्हापूर प्रस्तुत ‘रस्ते सुरक्षा आणि अपघात’ या विषयावर जळजळीत प्रकाश टाकून समाजप्रबोधन करणारा ‘ट्रॅफिक ट्रॅफिक’ हा लघुपट तयार करण्यात आला आहे. त्याचे प्रदर्शन रविवारी सकाळी शाहू स्मारक भवनमध्ये आमदार ऋतुराज पाटील, ‘मॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अल्वारिस बोलत होते.
शहर वाहतूक निरीक्षक स्नेहा गिरी यांनी ट्रॅफिकसारख्या जटिल विषयावर मार्मिक पद्धतीने चित्रण केल्याने तरुणांपर्यंत योग्य संदेश नेमक्या शब्दांत जाईल, असे सांगितले. संवेदना फौंडेशनचे अध्यक्ष संजय कात्रे यांनी वाहतूक सुरक्षेविषयी शाळा, महाविद्यालयांतूनच जागृती करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. फौंडेशनचे उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी प्रास्ताविक केले. लघुपटातील कलाकार गणेश आपटे यांनी मनोगत व्यक्त केले. या लघुपटातील कलाकार व चेतना विकास मंदिरातील विद्यार्थिनींचा यावेळी सत्कार करण्यात आला.