कोल्हापूर : गाय दूध खरेदी दरावरुन जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. त्याचे पडसाद सोमवारी ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या सभेत उमटले. पण, गाय दूध संकलन आणि विक्री यामध्ये मोठी तफावत असल्याने सध्या तरी खरेदी दरात वाढ करणे अशक्य असल्याचे संघ प्रशासनाने भूमिका मांडली. रोज ३ लाख लिटर दूध जादा होत असून त्यापासून पावडर करण्यापलिकडे काहीच पर्याय नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.‘गोकुळ’ने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केली आहे. सध्या ३.५ फॅट व ८.५ एस. एन. एफसाठी ३३ रुपये दर दिला जातो. शासनाच्या आदेशानुसार गाय दुधाला किमान ३४ रुपये दर देणे दूध संघांना बंधनकारक आहे. किमान दर मिळावा, यासाठी जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसापासून दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. संघाच्या दूध दर पत्रकाची होळी केली जात असून संघावर जनावरांसह मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. सोमवारी ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची सभा होती, त्यामध्ये गाय दूध दरवाढीवर चर्चा झाली. मात्र, गाय दुधातून प्रतिलिटर साडेचार रुपये तोटा होत असल्याने सध्या दरवाढ करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
गायीचे दूध वाढले असून पावडरच्या दरातही मोठी घसरण झाल्याने रोज दहा लाखांचे नुकसान होते. सध्या संघाकडे ३ हजार टन पावडर शिल्लक असून रोज ३५ टन पावडर तयार होते. त्यामुळे सध्या तरी दूध खरेदी दर वाढवणे अशक्य आहे. भविष्यात परिस्थिती सुधारली तर वाढ करु. - अरुण डोंगळे (अध्यक्ष, गोकुळ)