कोल्हापूर : प्रत्येक हॉस्पिटलमध्ये रक्त व रक्तघटकांचे सेवाशुल्काचे फलक लावणे, कोल्हापूर जिल्हा रक्तपेढी असोसिएशनने बंधनकारक केल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर, उपाध्यक्ष सतीश मेटे, सचिव सागर माळी व खजानिस सयाजी फराकटे यांनी पत्रकातून दिली. रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या हॉस्पिटलना ब्लॅकलिस्टमध्ये टाकू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात रक्तदात्यांचा टक्का वाढत असला, तरी व्यावसायिक रक्तदाते पुढे येत आहेत. कर्नाटकातील रक्तपेढ्या दात्यांना हेल्मेट, बुट, पेनड्राईव्ह, ट्रॅव्हल बॅग यासारख्या महागड्या वस्तूंचे आमिष दाखवले जाते, ही बाब निश्चितच चिंताजनक असून, कर्नाटकातील रक्तपेढ्यांनी सांगली, सोलापूर या परिसरात रक्तसंकलनासाठी काही एजंट नियुक्त केले आहेत. महाराष्ट्रातील काही रक्तपेढ्याही यामध्ये सहभागी दिसतात.असोसिएशनने रक्तदात्यांसाठी, हॉस्पिटल व रक्तपेढीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी समान धोरण ठरले आहे. यामध्ये रक्तपेढ्यातील रक्त व रक्त घटकांचे सेवाशुल्क, रक्तदाता कार्डची सुविधा, व्यावसायिक रक्तदाते नाकारणे, रक्तातील कमिशन मागणाऱ्या हॉस्पिटलची ब्लॅकलिस्ट तयार करून त्यांना रक्तपुरवठा न करणे, रक्तपेढी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देणे याचा समावेश आहे.रक्त घटकांच्या सेवाशुल्कांचे फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक केले आहे. जेणेकरून रुग्णांच्या नातेवाईकांना सेवाशुल्क कळले पाहिजे, यातून होणारी लूट थांबावी व या व्यवसायातील चुकीच्या पद्धतींना चाप लावण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अध्यक्ष प्रकाश घुंगूरकर व उपाध्यक्ष सतीश मेटे यांनी पत्रकात म्हटले आहे.
कमिशन एजंटाचा सुळसुळाटरक्त पुरवठ्यामध्ये कमिशन मिळावे, यासाठी बहुतांशी हॉस्पिटलमध्ये पीआरओ, अॅडमीनपासून ते ओ. टी. असिस्टंट, सहायक वैद्यकीय अधिकार ते मुख्य डॉक्टरापर्यंत साखळी आहे. ही साखळी रक्तपेढ्यांना वेठीस धरत आहे. काहीजण रक्तपेढ्यांकडे रक्त व रक्तघटकांच्या सेवा शुल्काबाबत कोटेशन मागणी करत असून हे भयानक असल्याचे पत्रकात म्हटले आहे.