उत्तूर : सरकार सांगते, पण आपण ऐकत नाही. कोरोना रोखायचा असेल तर वर्षभर मास्कचा वापर करावाच लागेल, असे प्रतिपादन अॅस्टर आधारचे डॉ. अजय केणी यांनी केले.
उत्तूर (ता. आजरा) येथील त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेतर्फे आयोजित २१ व्या संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमालेत ''''कोरोनानंतरचे जग व आपले आरोग्य कसे सांभाळावे'''' या विषयावर त्यांनी पहिले पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी सरपंच वैशाली आपटे होत्या.
संत ज्ञानेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. केणी, सरपंच वैशाली आपटे, जि. प. सदस्य उमेश आपटे, देशभूषण देशमाने, डॉ. प्रकाश तौकरी, टी. के. पाटील यांच्याहस्ते झाले. त्रिवेणीचा आदर्श पत्रकार पुरस्काराने सुनील दिवटे यांचा सन्मान केला.
डॉ. केणी म्हणाले, कोरोनाचे भय संपले असे समजू नका. अद्यापही रुग्ण घरात आठ दिवस थांबून उपचारासाठी येत आहे. उशिरा आल्याने न्युमोनिया होतो. आपण सवयी बदलत नसल्याने कोरोनाला आमंत्रण देत आहोत. अमेरिकेत कोरोनाचा फैलाव रोखता आला नाही. भारतात लोकसंख्येच्या १ टक्का रुग्ण आढळले आहेत.
दिवाळीनंतर आपण निष्काळजीपणाने वागत आहोत. अजूनही महाराष्ट्रात शून्य रुग्णसंख्या नाही. त्यामुळे सावधगिरी पाळायला हवी. ठराविक लक्षणे कोरोनाची आहेत, त्याकडे दुर्लक्ष करू नका. कोरोनामुळे अनेक व्याधी निर्माण होत आहेत. आपण कोरोना चाचणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो. चाचणीचा अहवाल येईपर्यंत विलगीकरण कक्षात राहिले पाहिजे. सिटी स्कॅनपेक्षा चाचणी करून घेणे महत्त्वाचे आहे. चाचणी करताना घाबरू नका. निदान लवकर झाले तर कोरोना बरा होतो. कोरोनाला थोपवायचे असेल तर मास्कचा वापर, हात वारंवार स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर, गर्दी टाळणे आदीबाबत सावध राहावे.
डॉ. भरत मोहिते, अजित उत्तूरकर, मीनाक्षी तौकरी, शशिकांत लोखंडे, अनिल लोखंडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. टी. के. पाटील यांनी स्वागत केले. श्रीकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले. सुहास पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. महेश करंबळी यांनी आभार मानले.
-----------------------
* हेल्मेट महत्त्वाचे
दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातले नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हेल्मेट घालण्याबाबत सरकारने सक्ती केली असली तरी ते वापरले जात नाही. या सवयी आपण बदलल्या पाहिजेत.
-----------------------
* फोटो ओळी :
उत्तूर (ता. आजरा) येथील लोकशिक्षण व्याख्यानमालेत डॉ. अजय केणी यांनी पहिले पुष्प गुंफले.
क्रमांक : ०३०१२०२१-गड-११