कोल्हापूर: सासूरवाशिणीने माहेरात ढवळाढवळ करणे बरे नव्हे असा प्रतीटोला कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने आमदार चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. आमदार पाटील यांनी बेताल वक्तव्ये करुन सुरळीत चाललेल्या आपत्ती व्यवस्थापन कामात गढूळपणा आणू नये अशी विनंतीही केली आहे.नागरी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे, माणिक मंडलीक, पंडीतराव सडोलीकर, सुभाष देसाई, महादेव पाटील, कादर मलबारी, संभाजीराव जगदाळे, एस.वाय.सरनाईक, राजू मालेकर, चंद्रकांत सुर्यवंशी,बाबासो देवकर, सुरेश पाटील, चंद्रशेखर देशपांडे, रणजित आयरेकर या प्रमुख सदस्यांनी गुरुवारी प्रसिध्दीपत्रक काढून आमदार चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
बुधवारी पाटील यांनी हम करे सो कायदा असे पालकमंत्री सतेज पाटील यांचे काम सुरु असून हसन मुश्रीफ व राजेंद्र पाटील यड्रावकरांना विश्वासात घेतले जात नाही, अशी टीका केली होती. याला प्रत्यूत्तर देताना नागरी कृती समितीने अडचणीच्या काळात टिका करुन राजकारण करुन का, येथील जनतेला वाऱ्यावर सोडून तुम्ही पुणे गाठले आहेत. तिथेच तुम्ही चांगले काम करता. येथील शाहू महाराजांच्या या नगरीतील जनता प्रशासनाच्या मदतीने कोल्हापूरचे रक्षण करायला खंबीर आहे, अशा शब्दात प्रत्यूत्तर दिले आहे.
कोरोनाच्या या आपत्तीकाळात सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असताना अचानकपणे येऊन अशी चुकीची बेताल वक्तव्ये करुन काम करणाऱ्यांना नाउमेद करु नका. पालकमंत्री सतेज पाटील, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलीक हे आमचे लोकप्रतिनिधी आहेत. ते व्यवस्थीत काम करत आहेत, त्यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करु नका, असेही कृती समितीने बजावले आहे.
हे कोल्हापूर आहे, येथील जनता तालीम मंडळे कोणाच्या आदेशाची वाट पाहत नाहीत, प्रशासनाच्या मदतीला धावून जातात. त्यांच्यावरही आमदार पाटील यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आणि बेजबाबदारपणाचे आहे असे खपवून घेणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.चंद्रकांत पाटील दोन महिने कुठे होतेपालकमंत्री व सर्व लोकप्रतिनिधी सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळून आपत्कालीन यंत्रणा हाताळत आहेत. गेली दोन महिने यंत्रणा हाताळत असताना चंद्रकांत पाटील कुठे होते, आताच त्यांना कसा काय साक्षात्कार झाला, असा प्रतिसवालही नागरी कृती समितीने केला आहे.