कोल्हापूर : पुण्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या साडी वाटपाच्या विरोधात कोल्हापुरात काही जणांनी लंगोट वाटपाचा प्रकार अशोभनीय आहे, अशा शब्दांत शहरातील तेरा तालीम संस्थांनी प्रसिद्धिपत्रकद्वारे निषेध नोंदविला आहे.प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राजर्षी शाहूंच्या विचाराने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची वाटचाल सुरू आहे. त्यांनी शहरातील अनेक तालीम संस्थांना आर्थिक साहाय्य करून नवीन इमारती बांधल्या. रेश्मा माने या खेळाडूला कोट्यवधी रुपये खर्चून अद्ययावत अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची तालीम बांधून दिली.
अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना खेळाचे साहित्य, वेपन्स, आंतरराष्ट्रीय दर्जाचे कीट्स दिले आहेत. तसेच कै. पै. कंदुरकर यांच्या संपूर्ण दवाखान्याचा खर्च करून त्यांच्या पश्चात संपूर्ण कुटुंबीयांची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्वीकारली आहे. त्याचबरोबर पै. गौरव रामाने (हिंगेवाडी, ता. राधानगरी), पै. तानाजी शिंदे (जत, जि. सांगली), पै. वैभव पाटील (रा. खानापूर, ता. भुदरगड) यांच्यासह अनेक पैलवानांचा खर्चही ते करत आहेत.
असे असताना त्यांच्यासारख्या व्यक्तीवर साडी वाटपाला विरोध म्हणून लंगोट वाटप करत आहेत. हे अशोभनीय आहे. असे कृत्य करणाऱ्या पैलवानाने आपण किती कुस्तीची मैदाने मारलीत? याचे उत्तर द्यावे. खरा पैलवान साडीच्या पदराआडून वार करत नाही.या पत्रकावर तटाकडील तालीमचे सचिव राजू जाधव, बाबूजमाल तालीमचे अध्यक्ष अमित चव्हाण, शाहू विजयी गंगावेस तालीमचे सचिव महेश चव्हाण, कै. नारायण मेढे तालीमचे अध्यक्ष किशोर पवार-मेढे, तुकाराम माळी तालीमचे अध्यक्ष शिवाजी पोवार, पाटाकडील तालीमचे अध्यक्ष सुभाष सरनाईक, सुबराव गवळी तालीमचे सचिव रमेश मोरे, वेताळ माळ तालीमचे अध्यक्ष अजित चव्हाण, नंगीवली तालीमचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, बालगोपाल तालीमचे अध्यक्ष निवास साळोखे, शिवाजी तालीमचे सचिव बाळासो बोंगाळे, उत्तरेश्वर तालीमचे सचिव विराज चिखलीकर, रंकाळावेश तालीमचे सचिव मुकुंद शिंदे, आदींच्या सह्या आहेत.