लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये नजीकच्या काळात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत. टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, विप्रो, इन्फोसिस, आदी कंपन्यांशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कागल पंचतारांकित एमआयडीसीतील मुख्य रस्त्यांची कामे आणि २५ कोटींच्या विद्युतीकरणाचे काम उद्योगमंत्री सुभाष देसाई व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले आहे. कोल्हापुरात नव्यानेच आलेल्या एसकेएलसारख्या कंपन्यांसह इतर कंपन्यांमधून शेकडो आयटीयन्स शिकून तयार आहेत. कोरोना महामारीची जागतिक स्थितीमुळे आयटी पार्क निर्मितीच्या कामाची गती थोडीशी कमी झाली असली तरी आयटी पार्कही लवकरच सुरू होईल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
दृष्टिक्षेपात पंचतारांकित औद्योगिक वसाहत-
एकूण भूखंड - १५००
उद्योग व व्यवसाय सुरू भूखंड -१ हजार
कायमस्वरुपी कर्मचारी - ४० हजार
कंत्राटी कर्मचारी- १२ हजार
रोजंदारी - ८ हजार
प्रमुख कंपन्या -
किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, इंडो-काउंट इंडस्ट्रीज लिमिटेड, रेमंड लक्झरी कॉटन्स लि., घाटगे-पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड, मेट्रो हायटेक को-ऑपरेटिव्ह टेक्स्टाईल पार्क, नागरिका एक्सपोर्ट, ग्रासिम प्रीमियम फॅब्रिक्स प्रा. लि., सुदर्शन जीन्स प्रा. लि., अंशुल स्टील, आदी नामवंत कंपन्या.
औद्योगिक वसाहतीसाठी यांचे ठरले योगदान
तत्कालीन उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी औद्योगिक वसाहतीचा दर्जा दिला.
१९९९ मध्ये हसन मुश्रीफ आमदार झाल्यानंतर पंचतारांकित औद्योगिक वसाहतीचा दर्जा.
सिद्धनेर्ली येथून दूधगंगा नदीवरून पाणी आणल्यानंतर खऱ्या अर्थाने या एमआयडीसीची वाटचाल सुरू.
सिद्धनेर्लीचे स्वर्गीय पांडुरंग दादू पाटील यांनी पाणी योजनेच्या जॅकवेलसाठी स्वतःची जमीन दिली.
त्या कार्यक्रमाला स्वर्गीय मंत्री पतंगराव कदम आले होते.
फोटो ओळी :
१)
कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत उद्योगमंत्री सुभाष देसाई व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून २५ कोटी खर्चून मुख्य रस्त्याचे आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विद्युतीकरणामुळे मुख्य रस्ता असा उजळून गेला होता. (फोटो-२५०५२०२१-कोल-कागल एमआयडीसी)
२)
औद्योगिक वसाहतीमधील मुख्य चौक असा देखणा दिसत आहे. (फोटो-२५०५२०२१-कोल-कागल एमआयडीसी०१)