कोल्हापूर : पृथ्वी आणि येथील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी ओझोनचा थर वाचविणे ही फक्त शास्त्रज्ञ आणि संशोधक यांची जबाबदारी नसून, ती वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. यासाठी फक्त एक दिवसाची नव्हे, तर संपूर्ण वर्षभराची चळवळ उभी करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागातर्फे आज, मंगळवारी जागतिक ओझोन दिनानिमित्त आयोजित विशेष जागृती कार्यक्रमात ते बोलत होते. अमेरिकन सोसायटी फॉर हीटिंंग, रेफ्रिजरेशन अॅँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स असोसिएशन व इंडियन सोसायटी आॅफ हीटिंंग, रेफ्रिजरेशन अॅँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पर्यावरणशास्त्र विभागाने तयार केलेल्या विद्यापीठाच्या ‘ग्रीन आॅडिट रिपोर्ट २०१३-१४’चे कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच ओझोन दिनानिमित्त अधिविभागात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. याप्रसंगी पुणे विभागाच्या संदीप निचेल यांनी रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशनर यांचा ओझोन थरावर होणाऱ्या परिणामांबाबत विश्लेषण केले. नॅशनल जिआॅग्राफिक सोसायटीचे छायाचित्रकार विक्रम पोतदार यांनी अंटार्क्टिकावर आढळणाऱ्या पोलर बीअर अर्थात बर्फाळ अस्वलांबाबत चित्रफितीद्वारे माहिती दिली. अधिविभाग प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आसावरी जाधव यांनी आभार मानले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्यासह पुणे विभागाचे अध्यक्ष शैलेश पाठक, डॉ. विकास जाधव, रचना इंगवले, संशोधक व विद्यार्र्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘ओझोन’चा थर वाचविणे ही सर्वांचीच जबाबदारी
By admin | Published: September 17, 2014 12:02 AM