समीर देशपांडे ।’ प्रश्न : गेल्या १५ वर्षांमध्ये आपला पक्ष विलीन करण्याची खूप चर्चा झाली. तुमची भूमिका काय ?उत्तर - मी सन १९९९ मध्ये आमदार झालो. मात्र, आमदार हा राज्याच्या हिताचे धोरण ठरवितो हा विचार पुढे नेण्यासाठी मी पक्षाची स्थापना केली. आपण पक्ष विलीन करणार नाही. आघाडी सरकारच्या काळात मला तसा आग्रह होता. मात्र, भाजपने माझ्यावर दबाव टाकला नाही. उलट ज्यांना प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळाली नाही त्यांना ‘जनसुराज्य’ची उमेदवारी दिली.
’ प्रश्न : तुमच्या या स्वतंत्र बाण्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातूनही काढण्याचा प्रयत्न झाला, हे खरे आहे का ?उत्तर - होय, खरे आहे. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मी लोकसभेला नांदेडमधून प्रीती शिंदे या धनगर समाजाच्या युवतीला उमेदवारी दिली. त्यावेळी मी चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. हा राग धरून मला मंत्रिमंडळातून काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र, आम्ही कार्यक्षेत्र वाढवले. त्याची अनेकांनी धास्ती घेतली आणि आमची कोंडी करायला सुरू केली. त्यांचा मध्यंतरीच्या काही वर्षांत आम्हाला मोठा त्रास झाला.
’ प्रश्न : विद्यमान आमदारांच्या कामाबाबत आपले मत काय?उत्तर - रस्ते, गटर्स ही कामे प्रत्येक आमदार करीत असतो. शासनाच्या योजनांमधून ती होतच राहतात. तुम्ही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी काय केलात हे महत्त्वाचे ठरते. विद्यमान आमदारांनी आपला भाऊ आणि मेहुणा यांना मोठे ठेकेदार बनविले आणि आपण त्यात भागीदार बनले हेच त्यांचे मोठे कर्तृत्व. बाकी विकास नाहीच
’ प्रश्न : शिक्षण, रोजगाराबाबत शाहूवाडीची स्थिती काय आहे?उत्तर - ज्या शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे करण्याचा कायदा केला त्यांच्याच नावाच्या तालुक्यामध्ये ५ वी ते ७ या तीन वर्गात १८५०० मुले शिकतात आणि ८ आणि ९ वी या दोन वर्गांत ८००० मुले, मुली शिकतात हे शाहूवाडी तालुक्याचे भीषण शैक्षणिक वास्तव आहे. शाहूवाडीतील १०० मुलांना शिक्षण सोडून लोणावळ्याच्या एकाच हॉटेलमध्ये काम करावे लागते ही वस्तुस्थिती आहे. शाहूवाडी, पन्हाळा तालुक्यांतील बेरोजगारांसाठी विद्यमान आमदारांनी एक साधे गुºहाळघरही सुरू केले नाही.
’ प्रश्न : अमर पाटील यांच्याबरोबरचा संघर्ष कसा संपवलात?उत्तर - मी अमरभाऊंना हे पटवून दिले की तुम्ही आणि मी दोघेही जनतेसाठी काम करीत आहोत. दोघांच्या भांडणामध्ये ज्या जनतेसाठीच हा डाव मांडला आहे त्यांची कामेच होणार नाहीत. तुम्ही तुमचा गट स्वतंत्र ठेवा. यापुढच्या काळात जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ, तिथे मी तुमच्या पाठीशी राहतो. ही भूमिका पटल्यानेच अमरभाऊ आणि कर्णसिंह गायकवाड यांनी माझ्यासमवेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
’ प्रश्न : तुमचा विकासाचा अजेंडा काय आहे?उत्तर - आमचा पक्ष ज्या सुराज्य संकल्पनेवर आधारित आहे त्यांची अंमलबजावणी हेच माझे ध्येय आहे. आपला विकास आपणच केला पाहिजे; परंतु लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातून सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याची जबाबदारी जनतेने पार पाडली पाहिजे. दहशतमुक्त, सुरक्षित, रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, रोजगार यासह त्यासाठी जीवन समाधानाने जगता यावे, असा समाज निर्माण व्हावा हाच माझा अजेंडा आहे. यावेळी जनतेला माझे हे मत पटविण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यांचे चित्र बदलून दाखविणार आहे. दहशतमुक्त, सुरक्षित, रस्ते, आरोग्य, पिण्याचे पाणी, रोजगार यांसह जीवन समाधानाने जगता यावे, असा समाज निर्माण व्हावा हाच माझा अजेंडा आहे.- विनय कोरे