कोल्हापूर : वाहतुकीचे नियम न पाळल्याने अनेकांचे हकनाक बळी जात आहेत. याविषयी प्रबोधन करावे लागते हे दुर्दैव. हे अपघात कमी होण्यासाठी डॉ. पवार लिखित ‘रस्ते सुरक्षा’संबंधी पुस्तक उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी येथे केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार लिखित ‘प्रकाश वाटेकडे सुरक्षित प्रवास’ व ‘सतनाम संत कबीर ’ या पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार महाडिक म्हणाले, देशात लोकसंख्येबरोबरच दिवसेंदिवस वाहनांची संख्याही वाढत आहे. नियमांचे पालन न केल्याने अनेक अपघात घडत आहेत. यासाठी परदेशाप्रमाणेच कायदे कडक करणे आवश्यक आहे. यासाठी शासकीय सेवेत तत्पर व कर्तव्य पार पाडणारे डॉ. पवार यांनी लिहिलेल्या या पुस्तकामुळे शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच याचा निश्चित उपयोग होईल. हे पुस्तक देशातील विविध भाषांमध्ये प्रकाशित होणे गरजेचे आहे. ती पु्स्तके प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाल्यास भविष्यात अपघात रोखण्यासाठी मदत होईल. यासाठी रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून देशपातळीवर ही अमंलबजावणी करण्यासाठी निर्णय घेऊ. या पुस्तकाबरोबरच सर्व शाळेतील मुलांसाठी डिजीटल लघुपटही बनविला तर तो अधिक प्रभावी ठरेल. तो उपक्रम शालेय स्तरावर पोहचविण्यासाठी जी मदत लागेल ती आपण स्वत: पूर्ण करू असाही विश्वास त्यांनी दिला. केंद्र व राज्यस्तरावर रस्ते निर्मिती तसेच अपघात टाळण्यासाठी कडक नियम केले जात आहेत, त्याचा सकारात्मक विचार जनतेने करावा. सुरक्षेची काळजी घेणे स्वत:चेही कर्तव्य आहे याची जाणीव ठेवली पाहिजे असे महाडीक यांनी सांगितले.
पुस्तकांविषयी माहिती देताना डॉ. पवार म्हणाले, भौतिक ध्येय सुरक्षित ठेवण्यासाठी मोटरवाहन कायद्याचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याला ‘वाहतूक शिक्षण’ची जोड दिली आहे. मिळालेला देह हा विनाकारण रस्ते अपघातात नष्ट होऊ देऊ नका. आपल्यावर कुटुंबाची, समाजाची, देशाची जबाबदारी आहे, त्यासाठी वाहतूकीचे नियम पाळून सर्वांची सुरक्षितता राखण्यासाठी सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. घरातील शिस्त आई-वडिल, रस्त्यावरील नियम वाहतूक व्यवस्था व शाळेतील शिस्त ही शिक्षकांनी पाळल्यास अपघात टळतील. यावेळी कायदा, आध्यात्मिक व गीतामधील काही संदेश देत त्यांनी मनुष्याच्या कर्तव्याची माहिती पवार यांनी थोडक्यात विषद केली.
शिक्षण सभापती अमरिश घाटगे म्हणाले की, शासकीय अधिकारी म्हणून कर्तव्य करीत असतानाच समाजाचे हित व विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच कायद्याची माहिती व अपघात टाळण्यासाठी नियमांची माहिती व्हावी या उद्देशाने लिहिलेली ही पुस्तकं नक्कीच भविष्यात अपघात रोखण्यासाठी खूप मदत करतील. ही सर्व पुस्तके जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा विश्वास त्यांनी दिला. महापौर हसीना फरास यांनी कोल्हापूरवासियांनी देखिल हे पुस्तक वाचावे, त्याचबरोबर वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाºया संस्थांनी केवळ जुजबी ज्ञान न देता, प्रशिक्षिताला परीपूर्ण शिक्षण देण्याचे आवाहन केले.
विधी व न्याय सेवा प्राधिकरणाचे सदस्य न्यायाधीश उमेशचंद्र मोरे म्हणाले, रस्ते अपघात टाळण्यासाठी व वाहनधारकांमध्ये प्रबोधन करण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल. तसेच ही पुस्तके न्यायालयीन ग्रंथालयातही ठेवण्यासाठी माझे प्रयत्न राहतील अशी ग्वाही दिली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्यासह लॉरी आॅपरेटर्स असोसिएशन, रिक्षा, टॅक्सी, ड्रायव्हिंग स्कूल, आदी संघटनांचे प्रतिनिधीसह आप्पा साळुंखे, वसंत पाटील, उत्तम पाटील पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कोल्हापूर जिल्हा लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी प्रास्ताविक केले. मोटार वाहन निरीक्षक पी. डी. सावंत यांनी स्वागत केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी आभार मानले.