गडहिंग्लज :
देशात धर्मांध शक्तींनी डोके वर काढले असून पुरोगामी विचारवंत आणि समाजसुधारकांची उघडपणे हत्या केली जात आहे. देशद्रोहाच्या खोट्या गुन्ह्याखाली अटक करून काहींचा आवाज दाबला जात असून फादर स्टेन स्वामी हे या धर्मांध शक्तीच्या अत्याचाराचेच बळी आहेत, असे परखड मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांनी व्यक्त केले.
फादर स्टेन स्वामी आणि फादर देवासिया वेल्लापनी यांच्या निधनानिमित्त आयोजित सर्वधर्मीय शोकसभेत ते बोलत होते. यावेळी फादर ज्यो मंतेरो, फादर पॉल फर्नांडिस, प्रफुल्लिता मचाडो यांची प्रमुख उपस्थिती होती.
येथील चर्चमध्ये ही शोकसभा झाली.
फादर ज्यो मंतेरो म्हणाले, भारतीय संस्कृती सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे. परंतु, हजारो वर्षांची ही परंपरा आज मोडीत काढली जात आहे.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने म्हणाले, धर्माचाच आधार घेऊनच धर्मांध शक्ती उघडपणे हिंसेचे समर्थन करीत आहेत. त्यांच्या विरोधात धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यायला हवे.
प्राचार्य सुरेश चव्हाण म्हणाले, प्रतिगामी शक्तींना रोखण्यासाठी म. फुले, राजर्षी शाहू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचीच गरज आहे.
राष्ट्र सेवा दलाचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानराजा चिघळीकर म्हणाले, धर्मांध राष्ट्रवादावर आधारित हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या राजवटीनेच फादर स्टेन यांचा बळी घेतला आहे.
यावेळी रफिक पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले. शोकसभेस प्राचार्य साताप्पा कांबळे, संतान बारदेस्कर, सुरेश दास, सुनीता नाईक आदींसह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते व सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते. इलियास बारदेस्कर यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद बारदेस्कर यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील शोकसभेत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फादर ज्यो मंतेरो, फादर पॉल फर्नांडिस, प्रफुल्लिता मचाडो, सिद्धार्थ बन्ने, सुरेश चव्हाण, रफिक पटेल आदी उपस्थित होते.
क्रमांक : १८०७२०२१-गड-११