कोल्हापूर : खुद्द बापानेच पुण्यातून रेल्वेने कोल्हापुरात आणून सोडलेली मुले भुकेने व्याकुळ होऊन लक्ष्मीपुरीतील एका मोबाइल दुकानाच्या पायऱ्यांवर बसली होती. बराच वेळ बसलेल्या या मुलांची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्यांना पोटभर खाऊ घालत मायेची फुंकर घातली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांनी नातेवाइकांचा शोध घेत त्यांना जिंतूर (जि. परभणी) येथील आजी-आजोबांच्या स्वाधीन करीत आपले कर्तव्य बजावले. समाजाच्या टीकेचे नेहमीच धनी होणाऱ्या पोलिस बांधवांनी आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवले.घडले ते असे : लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (दि. ८) सकाळी एका मोबाइल दुकानाच्या पायऱ्यांवर एक सहा वर्षांचा, एक आठ वर्षांचा आणि १० वर्षांचा असे तिघे भाऊ भुकेने व्याकुळ होऊन बसले होते. याबाबतची माहिती लक्ष्मीपुरी ठाण्याचे पोलिस कर्मचारी मुरलीधर रेडेकर यांना कळली. त्यांनी आणखी एका सहकाऱ्यास सोबत घेत त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी मायेने विचारपूस करीत त्या तिघा बालकांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांना व्यवस्थित खाऊपिऊ घातल्यानंतर त्यांच्याकडे मायेने विचारपूस केली. मात्र, त्यांच्याकडे मोबाइल अथवा संपर्क नंबर नव्हता. चौकशीत खुद्द वडिलांनीच पुण्यातून येथे कोल्हापुरात झोपेत असतानाच सोडल्याचे पुढे आले. आपली नावे सांगितली व पत्ता रा. अण्णा भाऊ साठेनगर जिंतूर (परभणी) असा सांगितला. ही बाब पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांच्या कानांवर घालण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मुलांच्या नातेवाइकांच्या शोधासाठी जिंतूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडून माहिती मिळाली. मुलांची काळजी व संरक्षणाकरिता बालगृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी या मुलांचे आजी-आजोबा कोल्हापुरात आले. मुलेही आजी-आजोबांना ओळखून त्यांच्याजवळ गेली. पोलिसांनी कागदपत्रांची पूर्तता करीत मुलांना आजी-आजोबांकडे सुपुर्द केले. विशेष म्हणजे मुले व आजी-आजोबांचे तिकीट काढून पोलिसांनीच त्यांना शुक्रवारी दुपारी जिंतूरला एस.टी. बसने पाठवून दिले.
बापानेच मुलांना सोडले..कोल्हापूर पोलिस माणुसकीला जागले; जिंतूरची मुले आजी-आजोबांकडे सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 11:31 AM