कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी वसतिगृहात ‘कोरोना’ रुग्णालय उभारले जाणार आहे. ‘कोरोना’चे रुग्णालय व अतिदक्षता विभाग तातडीने सुरू व्हावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे; मात्र यासाठी शिवाजी विद्यापीठच का? त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणार असून, त्याऐवजी जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत मोकळीच आहे. तिथे रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे सोमवारी केली.
संपूर्ण देशात ‘कोरोना’चा संसर्ग वाढत आहे. राज्यातून ‘कोरोना’ हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ, डॉक्टर, परिचारिका, पोलिसांसह सर्वजण रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत. या संकटाला तोंड देण्यासाठी कोल्हापुरात कोरोना रुग्णालय व अतिदक्षता विभाग तातडीने सुरू व्हावा, ही आमचीही इच्छा आहे. मात्र, ते शिवाजी विद्यापीठातच का? विद्यापीठात हे हॉस्पिटल उभारले तर विद्यार्थ्यांवर व त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल याचा जिल्हा प्रशासनाने विचार केला का? याचा गांभीर्याने विचार करावा. शिवाजी विद्यापीठ ऐवजी राज्य शासनाच्या मालकीची जागा व जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत येथे कोरोना रुग्णालय व नवीन अतिदक्षता विभाग सुरू करावे, अशी मागणी संजय पवार व विजय देवणे यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली.