उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथील विस्थापितांचे प्रश्न सुटेपर्यंत प्रकल्पात पाणीसाठा होऊ देणार नाही. मात्र, घळभरणीचे काम करणारच, असा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विस्थापित व अधिकारी यांच्या आढावा बैठकीत धरणस्थळावर केला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, आंबेओहोळसंदर्भात वेळोवेळी बैठका घेऊन प्रश्न निकालात काढले. आजच्या आढावा बैठकीत विस्थापितांचे प्रश्न समजले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संकलन रजिस्टर दुरुस्ती, देय जमिनी वाटप, पॅकेज वाटप, करपेवाडीच्या जगद्गुरू जमिनींचा प्रश्न, धरणग्रस्त दाखले, वैयक्तिक अडचणी याबाबत प्रांताधिकारी गडहिंग्लज यांनी २० ते ३० डिसेंबरपर्यंत प्रत्येक गावात बैठका घेऊन विस्थापितांचे प्रश्न निकालात काढावेत. देय जमिनीत मूळ मालक येऊ देत नसतील तर गुन्हे दाखल करा, असा आदेश तहसीलदार यांनी दिला. धरणग्रस्तांवरील सोमवारी दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात म्हणाले, काही मंडळी अधिकाऱ्यांना त्रास देत होती. त्यातील व्हिडिओ पोलिसांकडे आहेत. ते तपास करतील. मात्र, अशी घटना घडायला नको होती.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, मतभिन्नता हवी, पण ती एकमेकांच्या जिवावर नको, विस्थापितांनी टोकाची भूमिका घेऊ नये. अधिकाऱ्यांना या धरणाचा काय फायदा आहे. सामंजस्यपणे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवूया. करपेवाडी धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी घेत असल्याची ग्वाही देसाई यांनी दिली.
विस्थापितांचे प्रश्न जि. प. सदस्य उमेश आपटे, सदानंद व्हनबट्टे, शंकर पावले, विठ्ठल कदम, महादेव खाडे, राजू देशपांडे, संतोष बेलवाडकर, सागर सरोळकर, संजय पाटील, सखाराम कदम, आदींसह धरणग्रस्तांनी प्रश्न उपस्थित केले. धरणग्रस्तांच्या प्रश्नांना गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी उत्तरे दिली.
मुख्य कार्यकारी अभियंता महेश सूर्यवंशी यांनी स्वागत केले. यावेळी भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारी, प्रकल्प अभियंता स्मिता माने, तहसीलदार विकास अहिर, वसंत धुरे, मारुती घोरपडे, आदींसह पुनर्वसन, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
-------------------------
* मोठा बंदोबस्त अन् नाराजी
केवळ शंभरावर
धरणग्रस्तांचे पुनर्वसन होणे बाकी आहे. धरणग्रस्तांच्या उपस्थितीपेक्षा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. ग्रामस्थ दबक्या आवाजात कारवाईच्या भीतीने प्रश्न मांडत होते. मात्र, मुश्रीफांनी बोलण्यास संधी दिल्याने धडपण नाहीसे झाले. एवढा बंदोबस्त कशासाठी आणला असा प्रश्न विचारण्यात आला, तर अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी धरणग्रस्तांनी व्यक्त केली.
------------------------
फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे धरणग्रस्तांची मते जाणून घेताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ. क्रमांक : १११२२०२०-गड-०८
------------------------