कोल्हापूर : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर कोल्हापुरात पुन्हा वळिवाचा पाऊस सक्रिय होत आहे. आजपासून तीन दिवस वळीव मुक्कामालाच येणार आहे. जोरदार वारे आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बरसेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
मागील आठवड्यात वळिवाच्या पावसाने अवघ्या जिल्हाभर धुमाकूळ घातला. तब्बल आठवडाभर राेज दुपारनंतर झोडपून काढलेल्या या पावसाने मोठे नुकसानही केले. यातून सावरून परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोवर उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांची तीव्रता वाढल्याचे कारण होऊन जिल्ह्यावर पावसाळी ढग जमा होऊ लागले आहेत. दोन दिवसांपासून संध्याकाळी ढग जमा होतात, सकाळीही काही काळ अंधुक वातावरण असते आणि त्यानंतर पुन्हा दिवसभर उन्हाच्या झळांमुळे होरपळ वाढत आहे.बुधवारी दुपारी तापमानाचा पारा ३९ अंशावर गेला. सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता. संध्याकाळचे पाच वाजले तरी उन्हाचे चटके बसतच होते. दुपारी तर बाहेर पडणेही मुश्कील झाल्याने बऱ्यापैकी रस्ते ओसच दिसत होते. पुढील तीन दिवस दिवसभर असाच उन्हाचा कडाका राहणार आहे, तर संध्याकाळी वळिवाचा तडाखा बसणार आहे.
साधारणपणे आज (गुरुवार)पासून शनिवारपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस येईल, असे अंदाजात म्हटल्याने नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी तयारीत राहण्याची गरज आहे. आता उन्हाळी सोयाबीन पक्वतेच्या तर कुठे काढणीच्या अवस्थेत आहे. काकडी कलिंगडासह उन्हाळी भाजीपाल्याच्या पिकासाठी हा पाऊस मारक आहे. केवळ ऊस पिकासाठीच हा पाऊस तारक असणार आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांनाच हा पाऊस हवा आहे.