कोल्हापूर : राज्यात मान्सूनने एंट्री केली मात्र कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस कडकडीत ऊन पडले आहे. पावसाची एकही सरी कोसळलेली नाही. आज, मंगळवारी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करत असून मृग बरसणार की कोरडा जाणार, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
राज्यात यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला होता. खरीप पेरणीची धांदल उडाली होती. शनिवारी (दि. ५) मान्सून राज्यात सक्रिय झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. त्या दिवशी पावसाची रिपरिप राहिली. मात्र, त्यानंतर गेली दोन दिवस पावसाने एकदमच दडी मारली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
सूर्य आज सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी ‘मृग’ नक्षत्रात प्रवेश करत आहे. या नक्षत्राला ‘गाढव’ वाहन असून या कालावधी शेती उपयुक्त पाऊस राहील, असा अंदाज आहे. त्यामुळे आज निघणारे मृग नक्षत्र बरसणार की कोरडे जाणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.