पेठवडगाव : सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेत गावागावांत विकासाची चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कार्यकर्ते काँग्रेस पक्षात सहभागी होत आहेत. कार्यकर्त्यांना मानसन्मान, पाठबळ देऊन पक्षाची संघटनात्मक ताकद मजबूत केली जाईल, असे प्रतिपादन आमदार राजू आवळे यांनी केले.
मिणचे (ता. हातकणंगले) येथील जनसुराज्यचे युवा नेते सलीम जमादार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश येथील महात्मा फुले सूतगिरणी कार्यस्थळावर केला. यावेळी आमदार आवळे बोलत होते.
आमदार आवळे म्हणाले, गेली पंधरा वर्षे सत्तेत नसतानासुद्धा विकासाचे राजकारण केले. कार्यकर्तेही निष्ठेने सोबत राहिले. त्यांनी पुन्हा एकवेळ आमदारकी जिंकून दाखविली. काँग्रेसला साथ दिली. त्यामुळे त्यांना सोबत घेत, नव्याने प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साथीने तालुक्यात उच्चांकी विकासकामे केली जातील. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देत जास्तीत जास्त जागा जिंकूया. हातकणंगले हा काँग्रेसचा बालेकिल्ला बनविण्यासाठी युवकांनी पाठबळ द्यावे.
यावेळी सलीम जमादार म्हणाले, तालुक्यात युवकांची मोठी ताकद काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू. आमदार राजू आवळे सर्वांना सोबत घेत काम करीत आहेत. त्याच्या कामाची पद्धत पाहून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी संतोष भोसले, नितीन वाडकर, राहुल कदम, शहाबुद्दीन जमादार, अमोल भोसले, जावेद जमादार यांची भाषणे झाली. कार्यक्रमास अमोल घाटगे, शहनवाज जमादार, नवनाथ वाडकर, नईम मोमीन, अकबर मुजावर, मुज्जफर मोमीन, आदी उपस्थित होते. प्रवीण पाटील यांनी आभार मानले.