संतोष मिठारी कोल्हापूर : कमी कालावधीमध्ये एखादे कौशल्य आत्मसात करून नोकरी अथवा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याला सध्या विद्यार्थी आणि पालक प्राधान्य देत आहेत. शिक्षणाबाबत विद्यार्थ्यांचा कल बदलला आहे. त्यामुळे या वर्षी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांकडील (आयटीआय) विद्यार्थिसंख्या वाढली आहे. मात्र, अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडली आहेत.
राज्यात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या फेरीअखेर १,२५,६३७ जागांपैकी सुमारे ६४ हजार, तर ‘आयटीआय’कडील १,३८,३१७ जागांमधील ७७,९१४ जागांवर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीअखेर प्रवेश निश्चित केले आहेत.दहावीनंतर शासकीय अथवा खासगी तंत्रनिकेतनमध्ये पदविका पूर्ण करून अथवा बारावीनंतर अभियांत्रिकीची पदवी मिळविण्याकडे गेल्या सात-आठ वर्षांमागे विद्यार्थ्यांचा कल होता. मात्र, पदविका ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी लागणारी पाच वर्षे आणि वर्षागणिक वाढणारा आर्थिक खर्च, त्यासह पदवी मिळाल्यानंतर पुरेशा वेतनाची नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाकडे पाठ फिरविली आहे.
अभियांत्रिकी पदवीच्या तुलनेत ‘आयटीआय’द्वारे एक ते दोन वर्षांमध्ये एखादे कौशल्य आत्मसात करून रोजगार मिळविण्याची संधी साधण्याला विद्यार्थी प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दहावीला ९२ ते ९५ टक्के गुण असणारे विद्यार्थी आयटीआयमध्ये प्रवेशित होत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे या वर्षी राज्यातील एकूण ९०८ शासकीय व खासगी आयटीआयमधील १,३८,३१७ जागांसाठी ३,१७,०५८ अर्ज दाखल झाले आहेत.
उपलब्ध जागांपैकी ७७,९१४ जागांवरील प्रवेश निश्चित झाले आहे. अजून प्रवेशाच्या तीन फेऱ्या बाकी आहेत. आयटीआय फुल्ल होत असताना मात्र याउलट स्थिती अभियांत्रिकी महाविद्यालयांची आहे. राज्यातील एकूण ३४७ अभियांत्रिकी महाविद्यालयांतील १,२५,६३७ जागांसाठी तीन फेऱ्या पूर्ण झाल्या असून त्याअखेर ६४ हजार जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.
मंगळवार (दि. ३१) पासून व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी प्रवेश फेऱ्या सुरू झाल्या असून, त्यासाठी अंतिम मुदत दि. १४ आॅगस्टपर्यंत आहे. या मुदतीत अभियांत्रिकीच्या सर्व जागा भरणे शक्य नसल्याचे चित्र दिसते. विद्यार्थ्यांचा बदललेला कल लक्षात घेऊन अभियांत्रिकीतील शिक्षणाची रचना होणे आवश्यक आहे.
कोल्हापुरातील ‘आयटीआय’चे चित्र‘आयटीआय’मधील इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक, फिटर या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिकतर कल आहे. या अभ्यासक्रमांसाठी ९५ ते ९० टक्क्यांपर्यंत मेरिट लागले आहे. कोल्हापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध ३१ अभ्यासक्रमांच्या एकूण १३१९ जागांसाठी ३४२७ अर्ज दाखल झाले आहेत.दुसऱ्या फेरीअखेर ७७६ जणांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तिसऱ्या फेरीअंतर्गत ३९७ जणांचा समावेश आहे. तिसऱ्या फेरीतील इलेक्ट्रिशियनच्या सात जागांसाठी २७४९ विद्यार्थ्यांनी, मोटार मेकॅनिकच्या २९ जागांसाठी १५८१, तर फिटरच्या १४ जागांसाठी १६१० विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम दिला असल्याची माहिती उपप्राचार्य एम. एस. आवटे यांनी दिली.
शिक्षण पद्धतीतील फरकअभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी अभ्यासक्रमात ७० टक्के थिअरी (लेखी), ३० टक्के प्रॅक्टिकल (प्रात्यक्षिक) होते. पदविका अभ्यासक्रमात हे प्रमाण ६० : ४० आहे. मात्र, आयटीआयमध्ये ८० टक्के प्रात्यक्षिक, तर २० टक्के लेखी स्वरूप आहे. शिक्षण पद्धतीमधील या फरकाचा विद्यार्थी, पालक विचार करीत आहेत.
देशात दरवर्षी तयार होणाऱ्या अभियांत्रिकी पदवीधरांच्या तुलनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम प्रवेशावर होत आहे. अशा स्थितीत ज्ञानासह कौशल्यपूर्ण अभियांत्रिकी पदवीधर घडविण्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने पावले टाकली आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.- प्रा. प्रतापसिंह देसाई,अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था
आयटीआयमधील एक-दोन वर्षांच्या कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराची संधी मिळते. स्वत:चा व्यवसाय सुरू करता येतो. कौशल्याचे महत्त्व लक्षात आल्याने विद्यार्थ्यांचा आयटीआयकडील कल वाढला आहे.- योगेश पाटील, उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय