'कोल्हापूर : दहावीनंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस शुक्रवारपासून प्रारंभ झाला. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया २४ जुलैच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांकरिता ८ जून ते २५ जून या दरम्यान, विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज शुल्क भरून अर्ज निश्चित केले जाणार आहेत. ही प्रवेश प्रक्रिया राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत घेण्यात येणार आहे. आॅगस्ट २०१५ सत्रातील प्रवेश हे केंद्रीय पद्धती व नियमावली कळंबा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पाहण्यास ठेवण्यात आली आहे. यंदा प्रवेशासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आला असून, ज्या तालुक्यात विद्यार्थ्याने दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांना पूर्वी शंभर टक्के प्राधान्य तालुका आयटीआयमध्ये दिले जात होते. मात्र, यंदा यात बदल करण्यात आला असून, ७० टक्के प्राधान्य देण्यात आले आहे. अन्य तालुक्यांतील विद्यार्थ्यांना ३० टक्के प्राधान्यक्रम असणार आहे. हा बदल सर्वच आयटीआयमध्ये केला आहे. यापूर्वी फी २४० रुपये इतकी होती. ती आता ट्रेडनुसार दोन ते तीन हजार इतकी होणार आहे. क्रीडागुणांमध्येही बदल करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूर आयटीआयमध्ये ३२ कोर्सना १३६६ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश प्रक्रियेला शुक्रवारपासून जरी सुरुवात झाली असली तरी दहावीचा निकाल लागल्यानंतर गती येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी एकाही विद्यार्थ्याचा अर्ज कार्यालयाला प्राप्त झाला नाही. (प्रतिनिधी)कमी खर्चात नोकरीची हमी देणारा कोर्स म्हणून आयटीआयची विश्वासार्हता आहे. यंदा जरी शासनाने फीमध्ये वाढ केली असली तरी ३२ ट्रेडसाठी १३६६ जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा आम्ही प्रवेश प्रक्रियेसाठी संगणक सर्व्हर तांत्रिकदृष्ट्या सक्षम ठेवले आहेत. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ आयटीआयच्या शुल्कांमध्ये वाढ झाली नव्हती. ती यंदा करण्यात आली आहे. - रवींद्र मुंडासे, उपप्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर
आयटीआय आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 05, 2015 11:51 PM