कोल्हापूर : ‘दारूत रंगला, संसार भंगला,’ ‘खा गुटखा, मोज घटका’ अशा घोषणा देत, फलकांसह मानवी साखळीद्वारे जिल्ह्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज, बुधवारी व्यसनमुक्तीविरोधात जागृती केली. शहरासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी चौकाचौकांत, शाळांच्या प्रांगणात हा उपक्रम राबविण्यात आला. मानवी साखळीच्या उपक्रमाने जनस्वास्थ्य अभियानाचा समारोप झाला.गुटखा, तंबाखू, धूम्रपान व दारू या व्यसनविरोधी आणि विविध आरोग्य व पर्यावरण प्रदूषणाच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करणे, यासाठी विद्यार्थ्यांमार्फत समाज व जनजागृतीसाठी जनस्वास्थ्य दक्षता समिती, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे १ जानेवारीपासून जनस्वास्थ्य अभियान राबविण्यात आले. आज अभियानाच्या समारोपाप्रसंगी मानवी साखळीचा उपक्रम राबविण्यात आला. यात दुपारी चार ते पाच या वेळेत जिल्ह्णातील ८५० शाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी रस्त्यावर उतरल्या होत्या. काही शाळांनी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली. शहरातील ७० शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या. दसरा चौकात नेहरू हायस्कूल, साई हायस्कूल आणि देशभूषण हायस्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मानवी साखळी केली. ‘दारूचा पाश, संसाराचा नाश’, ‘सिगारेटचा झुरका, कॅन्सरचा विळखा’ अशा व्यसनविरोधी घोषणा देत, फलकांसह त्यांनी जनजागृती केली. यावेळी ‘जनस्वास्थ्य’चे अध्यक्ष दीपक देवलापूरकर, शामराव कांबळे, अजय अकोळकर, डी. डी. ठिपकुर्ले, ओंकार पाटील, अलका व मीना देवलापूकर, करिश्मा चिरमुरे, पूजा गुरव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जनस्वास्थ्य अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोस्टर्स स्पर्धेतील विजेते, आदर्श शाळा व शिक्षक, दारू, गुटखा व तंबाखूबंदी राबविलेली गावे, संस्था यांना सन्मानपत्रे देण्यात येतील. त्याचा कार्यक्रम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होईल.- दीपक देवलापूरकर, अध्यक्ष, जनस्वास्थ्य दक्षता समिती
दारूत रंगला, त्याचा संसार भंगला...
By admin | Published: January 08, 2015 12:10 AM