इंदूमती गणेश : लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्यावर्षीपासून राहू-केतूसारखा पाठीमागे लागलेल्या कोरोनाची चेन ब्रेक होईल की नाही माहीत नाही पण आता स्त्री धन असलेली गळ्यातली चेन मोडून घर चालवायची वेळ आली आहे... ही व्यथा आहे. गरीब-मध्यमवर्गीय व्यावसायिकांच्या कुटुंबांची. नोकरी मोठे व्यवसाय असणाऱ्यांना किती दिवस पण लॉकडाऊन केले तर काही फरक पडत नाही, पण आमच्यासारख्यांना आता हातातोेंडाशी घास आला आहे. यातून सरकराने पर्याय काढावा, अशी या सर्वसामान्य महिलांची अपेक्षा आहे.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात प्रत्येक नागरिकाच्या राशीला चिकटून बसलेल्या कोरोनाने मोठमोठ्या व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला तिथे सर्वसामान्य आणि रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्यांची व्यथा काय सांगावी. उच्च मध्यमवर्गीय व्यावसायिक तसेच नोकरदारांना काही दिवस काही आठवडे, काही महिने लॉकडाऊन झाले तरी त्यांचे कसे बसे निभावून जाते. पण बाजारपेठेत दुकान असलेले छोटे व्यावसायिक, फेरीवाले, भाजी विक्रेते, जीवनावश्यक वस्तूंची विक्री न करणारे व्यावसायिक यांच्या जगण्याचे मात्र वांदे झाले आहे. मागच्या वर्षातले सहा महिने बसून काढले. आता कसा बसा टुकुटुकू व्यवसाय सुरू आहे तर पुन्हा कोरोना वाढल्याने व्यवसायावर बंधने आली. अशा परिस्थितीत घर कसे चालवायचे असा प्रश्न हा गृहिणींना पडला आहे. कायम नवऱ्याच्या बरोबरीने व्यवसायात मदत करताना आता एकीकडे बसून राहायची वेळ आली तर दुसरीकडे खर्च आणि कर्जाचा डोंगर वाढत चाललाय, पाच-सहा माणसांचा डोलारा एकाच्याच्या खांद्यावर कसा पेलायचा या चिंतेतून मार्ग काढण्यासाठी आता स्त्रीधन असलेले दागिने विकून घर चालवायची वेळ आली आहे.
--
वर्षानुवर्षे आम्ही चटणी मसाला विकायचा व्यवसाय करतो. पण कधी दुकान बंद ठेवायची वेळ आली नाही. मागच्यावर्षी सहा महिने दुकान बंद होतं. तयार केलेला सगळा माल खराब झाला तो टाकून द्यावा लागला. या सीझनमध्येच चटणी विकली जाते. पण नवीन नियम आल्याने संध्याकाळ झाली की दुकान बंद करावं लागतंय. त्यात दोन दिवस लॉकडाऊनमध्ये दुकान पूर्णच बंद. घरचे खर्च कसे भागवायचे आम्ही.
लक्ष्मी घोडके
---
पिकतंय तिथं विकत नाही, म्हणून दोन पोर्लेमधून इथे कोल्हापुरात वाळकं, भाजीपाला विकायला येते. घरात खाणारी माणसं चार-चार, नवऱ्याचं ऑपरेशन झालं. माझी आजारपणं आहेत. तरी पण चार पैसे मिळतात म्हणून इथपर्यंत येते. कसाबसा खर्च भागतोय. आता आणि कडक लॉकडाऊन केलं तर रस्त्यावर यायची वेळ येईल.
सावित्री गवळी
---
मागच्या लॉकडाऊनमध्ये मुलग्याचं काम सुटलं. आता पुन्हा कामावर बोलावतात, पण पगार एवढा कमी आहे की दुसऱ्या गावात जाऊन काम करणं परवडत नाही म्हणून मुलाला नको म्हणाले, आता चार दिवस कामावर गेला तर आठ दिवस घरात बसावं लागतंय. सून, नातवंडे सगळ्यांचीच जबाबदारी त्याच्यावर. फुलं विक्रीचा व्यवसाय करतोय. तो पण आता लॉकडाऊनमध्ये बंद करावा लागणार, आम्ही खायचं काय
शांताबाई चौगुले
---