कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर नेमलेल्या अशासकीय मंडळाविरोधात समितीचे माजी संचालक संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली आहे. आपण अद्याप राजीनामा दिलेला नसल्याने अशासकीय मंडळात नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.बाजार समितीच्या संचालक मंडळाची ५ ऑगस्ट रोजी मुदत संपली. मुदत संपण्यापूर्वीच १९ पैकी १७ संचालकांनी राजीनामे दिले. मात्र त्यावेळी संजय जाधव व शशिकांत आडनाईक यांनी राजीनामे दिले नव्हते. जिल्हा उपनिबंधकांनी बहुतांश संचालकांनी राजीनामे दिल्याने समितीवर प्रदीप मालगावे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर राज्य शासनाने माजी आमदार के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील १३ जणांचे अशासकीय मंडळ नेमले.
याविरोधात जाधव व आडनाईक यांनी पणन संचालकांकडे तक्रार केली. आपण अद्याप राजीनामा दिलेला नाही; त्यामुळे अशासकीय मंडळावर सदस्य म्हणून आपली नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर, पणनच्या साहाय्यक संचालक डॉ. अर्चना अटपलवार यांनी सोमवारी (दि. २४) दुपारी अडीच वाजता पणन संचालकांच्या दालनात सुनावणी ठेवली आहे.