कोल्हापूर : महानगरपालिकेचे नवीन वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक उद्या, गुरुवारी सर्वसाधारण सभेत मांडले जाणार असून, बेटिंग व्यवसायाशी संबंधित असलेल्यांच्या यादीत नाव आल्यामुळे स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांना अंदाजपत्रक सादर करण्यास ‘भाजप-ताराराणी’च्या नगरसेवकांकडून सभागृहात विरोध होण्याची शक्यता आहे. भाजपचे काही कार्यकर्तेही प्रेक्षागृहात बसून घोषणाबाजी करण्याच्या तयारीत आहेत. कार्यकर्त्यांनी तसेच संकेत दिले आहेत. महानगरपालिकेचे २०१६-२०१७ वर्षाचे अंदाजपत्रक उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ‘स्थायी’चे सभापती मुरलीधर जाधव यांच्याकडून मांडले जाणार आहे. आयुक्तांनी स्थायी समितीला नवीन वर्षाचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावर स्थायी सदस्यांनी अभ्यास करून तसेच नगरसेवकांच्या सूचना विचारात घेऊन काही फेरबदल सुचविले आहेत. या बदलांसह अंदाजपत्रक मांडण्याचा अधिकार स्थायी समिती सभापतींना असतो. त्यानुसार जाधव हे उद्या अंदाजपत्रक मांडणार आहेत. मात्र, त्यांना भाजप व ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचा विरोध होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी उपायुक्त खोराटे यांना निवेदन देताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी तसा इशारा दिला आहे. जेव्हा सभापती जाधव अंदाजपत्रकाचे वाचन करण्यास सुरुवात करतील, तेव्हा घोषणाबाजी होण्याची शक्यता असून त्यानंतर सभात्याग केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी) सभात्याग केला तरीही बहुमताला महत्त्व!महापालिकेचे अंदाजपत्रक उद्याच्या सभेत मंजूर होणे आवश्यकच आहे. त्यामुळे जरी भाजप व ताराराणी आघाडीने सभात्याग केला तरी बहुमताच्या जोरावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अंदाजपत्रक मंजूर करून घेतील. सभापती जाधव यांना अंदाजपत्रक मांडण्यास काही अडथळे निर्माण झालेच, तर स्थायी समितीचा कोणीही सदस्य ते मांडू शकतो, असे नगरसचिव कार्यालयातून सांगण्यात आले.
अंदाजपत्रक मांडण्यास जाधव यांना विरोध!
By admin | Published: March 30, 2016 1:07 AM