शिरटे : ‘सातारचे प्रतिसरकार...गळालेल्या पानातील स्वातंत्र्याची रत्ने’ या शीर्षकाखालील लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) या क्रांतिसिंहांच्या गावाने पुढाकार घेत या स्वातंत्र्यलढ्याचा ‘जागर’ करण्याचा निर्धार केला आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारचा लढा अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबतची वास्तवता दोन लेखांद्वारे मांडण्यात आली होती. दोन्ही लेखांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या अनुषंगाने क्रांतिसिंहांचे गाव असलेल्या येडेमच्छिंद्र येथे मंगळवारी (दि. २) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून पर्यायी यंत्रणा उभारून ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडले होते. प्रतिसरकारच्या स्थापनेस यंदा ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात क्रांतिसिंहांच्या अलौकिक कार्याचा विसर पडू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. क्रांतिसिंहांचे कार्य नव्या पिढीपुढे मांडण्यासाठी, त्यांच्या शौर्याचे स्मरण करून प्रेरणास्रोत म्हणून त्यांच्या स्मृती जपण्याची गरज निर्माण झाली आहे.लेखातून मांंडल्या गेलेल्या या विषयावर उद्या, मंगळवारी सकाळी १० वाजता ज्योतिर्लिंग मंदिर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रतिसरकारचा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा करून नियोजन केले जाणार आहे.लेखाच्या प्रतींचे वाटप‘जागर’ या सदरामधून सलग दोन रविवारी प्रसिद्ध केलेल्या लेखाच्या पाचशे छायांकीत प्रती येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजीराव पाटील व हौसेराव पाटील यांनी घरोघरी वाटल्या. ग्रामस्थांमधून यामुळे जागृती निर्माण झाली. त्यामुळे बैठकीबाबतचे नियोजन करण्यात आले.प्रतिसरकार हे तत्कालीन सातारा जिल्ह्यात स्थापन झाले होते. शासनाने हे लक्षात घेऊन सातारा येथे क्रांतिसिंहांचे भव्य दिव्य स्मारक उभारणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात मांडलेल्या प्रतिसरकारचे सर्व शिलेदार व नानकसिंग यांच्याविषयीची माहिती नवयुवकांना प्रेरणा देणारी आहे.- आनंद पाटील, शिक्षक, महादेववाडी (ता. वाळवा)
प्रतिसरकारच्या अमृतमहोत्सवाचा ‘जागर’; येडेमच्छिंद्र ग्रामस्थांचा निर्धार; ‘लोकमत’च्या लेखाची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 1:10 AM