कोल्हापूर : अंगावर रोमांच उभे करणारे वीर रसयुक्त पोवाडे, छक्कड आणि क्रांतिकारी गीते सादर करीत श्रमिक शाहिरांनी श्रमिक संस्कृतीचा अन् क्रांतीचा जागर केला. निमित्त होते श्रमिक प्रतिष्ठान आणि कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेतर्फे लोकशाहीर द. ना. गव्हाणकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रमिक शाहिरीचा यळकोट’ या कार्यक्रमाचा. येथील शाहू स्मारक भवनात मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात ‘माझी मैना गावावर राहिली,’ ‘असं घडलंच नव्हतं गड्या,’ अशा एकाहून एक सरस शाहिरी गाण्यांनी शाहीरपे्रमींना सुमारे दोन तास खिळविले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे उमा पानसरे आणि महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेचे अध्यक्ष राजाराम जगताप यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाची सुरुवात द. ना. गव्हाणकर यांच्या ‘धरतीची आम्ही लेकरं’ या गीताने सुरू झाली. शाहीर सदाशिव निकम आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर शाहीर रंगराव पाटील गव्हाणकरांचा जीवनपट मांडणारा पोवाडा सादर केला. डफ आणि ढोलकीवरील दमदार थाप व भारदस्त आवाज यांमुळे या कार्यक्रमाला रंगत आली. शाहीर संजय जाधव यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावावर राहिली’ ही छक्कड गायिली. याच छक्कडीचा धागा पकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्र शासनाची उदासीनता व्यक्त करणारी ‘माझी मैना गावावर राहिली, तिची पर्वा कुणाला नाही राहिली’ ही छक्कड राजू राऊत यांनी सादर केली. सदाशिव निकम यांच्या ‘असं काही घडलंच नाही गड्या’ या पोवाड्याला टाळ्या पडल्या. आलम बागणीकर यांनी मुंबईची लावणी सादर केली. दिलीप सावंत यांनी अमर शेख यांची रचना सादर केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा शाहीर परिषदेचे अध्यक्ष शहाजी माळी, श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे, शाहीर गव्हाणकरांच्या कन्या मिता सामंत, भाकपचे जिल्हा सचिव एस. बी. पाटील, स्मिता पानसरे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला नागरिकांनी गर्दी केली होती. मिलिंद यादव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)उमा पानसरे यांची प्रथमच उपस्थिती ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांची हत्या १६ फेबु्रवारीला झाली होती. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात उमा पानसरेही जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर उमा पानसरे कोणत्याही जाहीर कार्यक्रमाला हजर राहिलेल्या नव्हत्या. मंगळवारी ‘श्रमिक शाहिरीचा यळकोट’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमास त्या उपस्थित राहिल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रमही त्यांनी पाहिला. उद्घाटनानंतर बोलताना ‘कॉम्रेड गोविंद पानसरे यांची चळवळ पुढे सुरूच राहावी, त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.
श्रमिक शाहिरांचा जागर
By admin | Published: May 20, 2015 12:26 AM